42
योग्य-अयोग्य यावर बोलणे आणि बोलू देणे म्हणजेच खरी लोकशाही: कामगार नेते काशिनाथ नखाते
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १५ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी / चिंचवड: “लोकशाही हा शब्द आपण रोज ऐकतो; मात्र लोकशाहीचा खरा अर्थ, नागरिकांचे अधिकार आणि संविधानाने दिलेले स्वातंत्र्य आपण सखोलपणे समजून घेणे आवश्यक आहे. योग्य-अयोग्य यावर बोलण्याचा अधिकार असणे आणि आपले मत मांडणाऱ्या प्रत्येकाला निर्भयपणे बोलू देणे, त्याच्या मताशी असहमती असली तरीही त्याचा आवाज न दडपणे, हाच लोकशाहीचा खरा गाभा आहे,” असे प्रतिपादन कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष व कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केले.
‘लोकशाही दिना’च्या औचित्याने कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ आणि कष्टकरी रिक्षा-टॅक्सी चालक संघर्ष महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे (सरनामा) सामूहिक वाचन करण्यात आले. या प्रसंगी लोकशाही मूल्यांचे जतन, संविधानिक अधिकार आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्भयपणे आवाज उठविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना काशिनाथ नखाते म्हणाले. अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीची व्याख्या ‘लोकांनी, लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य’ अशी केली होती. सत्तेमध्ये प्रत्येक नागरिकाचा समान वाटा असल्याने व्यवस्थेतील चुकीच्या गोष्टींना विरोध करणे हा सामान्य नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे श्रीमंत असो वा गरीब, प्रत्येकाच्या मताला समान मूल्य मिळाले आहे. मतभेद असणे हे जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे, त्यामुळे मतभेद व्यक्त करण्यासाठी सुरक्षित वातावरण असणे काळाची गरज आहे. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि प्रसारमाध्यमे हे लोकशाहीचे मुख्य स्तंभ असून कोणत्याही दबावाशिवाय नागरिकांचे अधिकार अबाधित राहिले पाहिजेत.
आज देशासमोर महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, असंघटित क्षेत्रातील कष्टकऱ्यांच्या ज्वलंत समस्या आणि सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या खोट्या माहितीचे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी अत्यंत जागरूक राहून सत्य पडताळणे, निर्भयपणे प्रश्न विचारणे आणि संविधानिक मार्गाने हक्कांसाठी लढणे गरजेचे आहे. लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित नसून दैनंदिन जीवनात समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा स्वीकार करणे हीच खरी लोकशाही असल्याचे नखाते यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमास तिन्ही संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, कामगार, फेरीवाले, रिक्षा-टॅक्सी चालक तसेच कष्टकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
