37
अश्लील डीजे डान्समुक्त पुण्याच्या प्रयत्नांना अखेर यश; अभिनेत्री टीना शर्मा घेवारे यांच्या पाठपुराव्याला यश, संपूर्ण महाराष्ट्रात कारवाईची मागणी!
पुणे / पिंपरी प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. १३ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे / पिंपरी: महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख जपण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांमधील अश्लील व विभत्स डीजे डान्स प्रकारांवर कडक बंदी घालावी, या मागणीसाठी अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या टीना शर्मा घेवारे यांनी केलेल्या प्रदीर्घ पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. पुणे जिल्हा प्रशासन आणि पुणे पोलीस दलाकडून अशा अश्लील प्रकारांवर सुरू केलेल्या धडक कारवाईचे त्यांनी स्वागत केले असून, हीच मोहीम केवळ पुण्यापुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याची ठाम मागणी त्यांनी केली आहे.
गेल्या काही वर्षांत सार्वजनिक कार्यक्रमांच्या नावाखाली अश्लील व विभत्स नृत्यप्रकार वाढल्यामुळे संतांची व महापुरुषांची भूमी असलेल्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला धक्का बसत होता. याविरोधात टीना शर्मा घेवारे यांनी महाराष्ट्र शासन, गृह विभाग, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे पोलीस आयुक्तालयाकडे सातत्याने निवेदने देऊन कारवाईची मागणी केली होती.
या पाठपुराव्यामध्ये चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.
“आमच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यात प्रशासनाकडून अशा अश्लील डीजे डान्स प्रकारांवर प्रत्यक्ष कारवाई होत आहे, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. महाराष्ट्राची ओळख ही सुसंस्कृत आणि पुरोगामी राज्य म्हणून आहे, त्यामुळे या ओळखीला धक्का लावणारे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.”— टीना शर्मा घेवारे, अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या.
पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या कारवाईचे कौतुक करताना टीना शर्मा घेवारे यांनी स्पष्ट केले की, एका शहराची ओळख वापरून इतर जिल्ह्यांत जर असे अश्लील डीजे डान्स सादर केले जात असतील, तर त्यावरही प्रशासनाने बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
त्यांनी प्रशासनाकडे केलेल्या प्रमुख मागण्या सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देताना आयोजक आणि कलाकारांसाठी कडक आचारसंहिता लागू करावी. अश्लीलता आढळल्यास केवळ कलाकारांवरच नव्हे, तर आयोजकांवरही गुन्हे दाखल करावेत. पुणे पोलीस प्रशासनाप्रमाणेच महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारांविरोधात विशेष मोहीम उघडण्यात यावी.
कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासनाने एकत्रितपणे काम केल्यास सार्वजनिक कार्यक्रमांमधील अश्लीलतेला मुळासकट आळा घालता येईल, असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
