35
जागतिक पर्यटन दिनानिमित्त २८ सप्टेंबरला अकोला येथे कृषी पर्यटनावर विभागीय कार्यशाळा; पर्यटन उपसंचालक विजय जाधव यांची माहिती!
अमरावती / अकोला प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. १३ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अकोला: जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी अकोला येथे कृषी पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी विभागीय स्तरीय भव्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती विभागातील शेतकरी, उद्योजक आणि व्यावसायिकांनी या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन संचालनालयाचे प्रादेशिक उपसंचालक विजय जाधव यांनी केले आहे. अमरावती येथील नियोजन भवनात आयोजित करण्यात आलेल्या विशेष नियोजन बैठकीत ते बोलत होते.
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील ‘वेदनंदिनी कृषी पर्यटन केंद्राच्या’ सहकार्याने पर्यटन संचालनालय ही कार्यशाळा आयोजित करत आहे. या कार्यशाळेत शासनाच्या सर्व संबंधित विभागांनी त्यांच्याकडील नोंदणीकृत संस्था, शेतकरी, बचत गट व नवउद्योजकांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. तसेच स्थानिक उत्पादनांच्या प्रदर्शन व विक्रीसाठी स्वतंत्र दालने (Stalls) उपलब्ध करून दिली जाणार असून यासाठी इच्छुकांनी नोंदणी करणे आवश्यक असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीस उमेद अमरावतीचे जिल्हा व्यवस्थापक रोशन उमक, माविमचे पवन देशमुख, MCED चे प्रकल्प अधिकारी एस. ए. कादरी, उपसंचालक (माहिती) अनिल आलुरकर, अमरावती विभागातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, शाश्वत विकास केंद्राचे गणेश चौधरी, वेदनंदिनी कृषी पर्यटन केंद्राचे संचालक प्रकाश पोहरे, महेंद्री कृषी पर्यटन केंद्राचे संचालक विजय श्रीराव, कॅनव्हास फाउंडेशनचे अध्यक्ष आशिष शेरेकर, जिल्हा अग्रणी बँक तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी उपस्थित होते.
पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास साधण्यासोबतच स्थानिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर यंदाच्या पर्यटन दिनानिमित्त विशेष भर देण्यात आला आहे. ‘आई’ योजना व महिला सक्षमीकरण दुर्गम भागातील महिलांना पर्यटन व्यवसायाशी जोडून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. कृषी पर्यटन केंद्रांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीमालाला योग्य बाजारपेठ मिळवून दिली जाईल. ‘महिला शेतकरी वर्ष’ साजरे केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला उद्योजक व सेंद्रिय शेतकऱ्यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व ‘माविम’च्या माध्यमातून महिला बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू व तृणधान्य पदार्थांचे प्रदर्शन व विक्री स्टॉल्स उभारले जातील. या प्रसंगी शाश्वत विकास केंद्र (अमरावती) यांच्या वतीने प्रकाशित त्रैमासिक बातमीपत्राच्या पुस्तिकेचे विमोचन पर्यटन उपसंचालक विजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
