42
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोठा निर्णय; मोशी डेपोचा भार कमी करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाच्या विकेंद्रीकरणासाठी जागा प्रस्तावित!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान दि. १३ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, शाश्वत आणि विकेंद्रित पद्धतीने करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील विविध भागांतील जागा प्राथमिक स्तरावर प्रस्तावित केल्या आहेत. मोशी कचरा डेपोवरील कचऱ्याचा सतत वाढता ताण लक्षात घेता, शहरात प्रभाग स्तरावरच कचऱ्याचे वर्गीकरण, वाहतूक आणि शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
आरक्षित जागांची पाहणी करून प्रस्तावित जागांवर तांत्रिक योग्यता, वाहतूक सोय, क्षेत्रफळ आणि पर्यावरणीय निकषांची तपासणी सुरू आहे. आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्यानंतरच या जागांची अंतिम निश्चिती केली जाणार आहे.
१) सेक्टर क्रमांक २२ (प्रभाग १३) पाण्याच्या टाकीजवळ, २) चिंचवड (प्रभाग १७): आरक्षण क्र. १/८९, सर्व्हे नं. ११३, ११४ व ११६ पैकी, ३) चिंचवड (प्रभाग १८): आरक्षण क्र. २२१, ४) दत्तनगर (प्रभाग १०): राम मंदिराजवळ, ५) दिघी गायरान: सर्व्हे नं. ७७, ६) चोविसावाडी: आरक्षण क्र. २/१६,
७) पुनावळे (पहिली जागा): सर्व्हे नं. २३/६/३ पै., २३/६/२ पै., २३/५ पै., २३/१ पै., २३/६/४ पै., २३/२/१ पै. व २३/२/२, ८) पुनावळे (दुसरी जागा): सर्व्हे नं. २६/१/६, २६/३/१ व २६/३/२ पै, ९) गवळीमाथा: परिसरातील उपलब्ध जागा, १०) खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड: हद्दीतील जागेबाबत प्रशासकीय पातळीवर सकारात्मक चर्चा सुरू.
प्रस्तावित जागांवर त्यांच्या क्षेत्रफळानुसार विविध आधुनिक प्रकल्प उभारले जातील. यामध्ये कचऱ्याचे वर्गीकरण व पुनर्वापर (MRF), ऊर्जा निर्मिती, सेंद्रिय कचऱ्यापासून बायोगॅस व बायोफ्युएल निर्मिती तसेच प्लास्टिक कचऱ्यापासून उपयुक्त उत्पादने तयार करण्याच्या यंत्रणांचा समावेश असेल.
“पिंपरी-चिंचवड शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी विकेंद्रीकरणावर भर दिला जात आहे. मोशी डेपोवरील भार कमी करण्यासोबत कचऱ्याचे संकलन व प्रक्रिया अधिक कार्यक्षम केली जाईल. प्रस्तावित जागांची तांत्रिक तपासणी करून सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नगरसदस्यांच्या संमतीने अंतिम निर्णय घेतला जाईल. नागरिकांना त्रास होणार नाही आणि परिसर पर्यावरणपूरक राहील याची पूर्ण दक्षता घेतली जाईल.”— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.
“प्रस्तावित जागांच्या क्षेत्रफळानुसार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुर्गंधविरहित ट्रान्स्फर स्टेशन, मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी (MRF), बायोगॅस, बायोफ्युएल व प्लास्टिक प्रक्रियेचे प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. प्रत्येक जागेची तांत्रिक व व्यवहार्यता तपासणी पूर्ण करूनच पुढील निर्णय होईल.”— विक्रांत बगाडे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
