news
‘सरकारी नोकरीच्या खोट्या आमिषांना बळी पडू नका’; पिंपरी-चिंचवड पोलिसांचे नागरिकांना आवाहन, भामट्यावर गुन्हा दाखल!‘साक्षीदारांची सुरक्षा धोक्यात; धमकावणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा’; किशोर आवारे खटल्यातील प्रत्यक्षदर्शींची ठाम मागणी!‘नागरिकांना त्रास न होता पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाने कचऱ्याची विल्हेवाट लावणार’; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन!‘कृषी पर्यटनातून साधणार ग्रामीण विकास अन् महिला सक्षमीकरण’; पर्यटन उपसंचालक विजय जाधव यांचे प्रतिपादन!‘महाराष्ट्राची सांस्कृतिक प्रतिमा डागाळणारे अश्लील प्रकार खपवून घेणार नाही’; पुणे प्रशासनाच्या कारवाईनंतर टीना शर्मा घेवारे आक्रमक!
Home पिंपरी चिंचवड ‘साक्षीदारांची सुरक्षा धोक्यात; धमकावणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा’; किशोर आवारे खटल्यातील प्रत्यक्षदर्शींची ठाम मागणी!

‘साक्षीदारांची सुरक्षा धोक्यात; धमकावणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा’; किशोर आवारे खटल्यातील प्रत्यक्षदर्शींची ठाम मागणी!

अचानक पोलीस संरक्षण हटविल्याने संताप; वडगाव मावळ सत्र न्यायालयात १ ऑक्टोबरला होणार पुढील सुनावणी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

किशोर आवारे खून खटल्यात साक्षीदारांवर दबाव अन् धमक्यांचे गंभीर आरोप; ‘साक्ष बदलण्यासाठी’ दबाव आणल्याचा दावा!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे दि. १३ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या बहुचर्चित खून खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांवर दबाव आणला जात असल्याचे अत्यंत गंभीर आरोप समोर आले आहेत. पिंपरी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खटल्यातील प्रमुख साक्षीदारांनी यासंदर्भात अनेक धक्कादायक दावे केले. साक्षीदारांना डोक्याला बंदूक लावून धमकावणे, मध्यरात्री घरी जाऊन साक्ष बदलण्यासाठी दबाव आणणे आणि न्यायालयाने दिलेल्या पोलिस संरक्षणाची अचानक कपात करणे, यांमुळे साक्षीदारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
तळेगाव नगरपरिषदेसमोर १२ मे २०२३ रोजी किशोर आवारे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सत्र खटला क्रमांक ५४/२०२३ हा वडगाव मावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू आहे. खटल्याच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब अत्यंत निर्णायक मानले जात आहेत.

पत्रकार परिषदेत उपस्थित साक्षीदारांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. आकाश जगताप (प्रत्यक्षदर्शी साक्षीदार) घटनेचे मोबाईल व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या आकाश जगताप यांना संदीप गराडे याने ऑफिसमध्ये बोलावून थेट डोक्याला बंदूक लावून साक्ष न देण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला. याशिवाय चंद्रभान खळदे व नामदेव दाभाडे यांनीही धमकावल्याचे सांगण्यात आले. दत्तात्रय पारगे जानेवारी २०२६ मध्ये अज्ञात व्यक्तींनी एका ठिकाणी नेऊन खोटी साक्ष देण्यासाठी दबाव आणला, तसेच ३० मार्च रोजी मध्यरात्री घरी जाऊन धमकी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मिलिंद अच्युत धमक्या मिळाल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांना संरक्षण देण्यात आले होते. मोहसीन मुलाणी किशोर आवारे यांच्या हत्येपूर्वीच या कटाची माहिती मिळाल्याने त्यांनी आवारे यांना सावध केले होते. मुलाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येसाठी तब्बल ५ कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती. आरोपी सुधाकर शेळके यांनी मुख्य सूत्रधाराचे नाव लपवण्याच्या अटीवर संजय कारले याला पिस्तूल खरेदीसाठी २० लाख रुपये रोख (अॅडव्हान्स) दिले होते. या संपूर्ण कटात शाम नगडिर, भानू खळदे, संदीप गराडे आदींचा सहभाग असल्याचे कारले याने सांगितल्याचा दावा मुलाणी यांनी केला.

महत्त्वाचे साक्षीदार अनिल पवार यांना राजकीय सूडबुद्धीतून त्रास दिला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आगामी तळेगाव नगरपरिषद निवडणुकीत पवार कुटुंबीयांचा वाढता राजकीय प्रभाव रोखण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा दावा तक्रारीत आहे.
सुरुवातीला ‘मकोका’ लावूनही प्रभाव कमी न झाल्याने, आमदार शेळके यांनी स्वतःच्या जिवाला धोका असल्याचे भासवून ४ जुलै २०२५ रोजी विधानसभेत दबाव आणत विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यास भाग पाडले. या एसआयटीच्या माध्यमातून पवार यांना सातत्याने त्रास दिला जात असल्याचे म्हटले आहे. आरोपी चंद्रभान खळदे याने पवार यांना थेट कोर्ट परिसरात जीवे मारण्याची धमकी दिली होती, तर संदीप गराडे याच्या धमकीचे कॉल रेकॉर्डिंग पोलिसांना देऊनही वडगाव मावळ पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.
न्यायालयाच्या निर्देशानुसार अनिल पवार व इतर साक्षीदारांना ७ एप्रिल २०२६ रोजी २४ तास पोलिस संरक्षण देण्यात आले होते. मात्र, ११ ऑगस्ट २०२६ रोजी कोणतीही पूर्वकल्पना न देता हे संरक्षण अचानक काढून घेण्यात आले. आमदारांच्या दबावाखाली पोलिसांनी हे संरक्षण हटवले का, असा संताप व्यक्त करत या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

या खटल्यातील आरोपांबाबत अंतिम न्यायालयीन निष्कर्ष निघणे अद्याप बाकी आहे. या प्रकरणाची उच्च न्यायालयातील पुढील सुनावणी २४ सप्टेंबर २०२६ रोजी, तर वडगाव मावळ सत्र न्यायालयातील सुनावणी १ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे.
या पत्रकार परिषदेस आकाश जगताप, मोहसीन मुलाणी, अनिल पवार, मिलिंद अच्युत, दत्ता पारगे, निलेश पारगे व सुनील करंडे आदी उपस्थित होते. साक्षीदारांना धमकावणाऱ्यांवर तातडीने कारवाई करून त्यांना पूर्ववत चोवीस तास सुरक्षा पुरवावी, अशी ठाम मागणी या वेळी करण्यात आली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!