34
पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या अट्टल भामट्यास खंडणी विरोधी पथकाकडून अटक!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १३ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी / भोसरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागात नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवून बनावट कागदपत्रे व नियुक्तीपत्रे तयार करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला खंडणी विरोधी पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे. प्रतीक राजेश धायगुडे (वय २६, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी; मूळ रा. अकलूज, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
खंडणी विरोधी पथकाला १२ सप्टेंबर २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे फसवणूक झालेल्या पीडितांशी संपर्क साधून सविस्तर माहिती घेण्यात आली. आरोपी प्रतीक धायगुडे याने पाच जणांना महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्रे दिली व त्यांच्याकडून १,१४,११२ रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
माहिती मिळताच पोलिसांनी शिवरोड, धावडे वस्ती, भोसरी येथून आरोपीला तातडीने ताब्यात घेतले. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ५६६/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (२) (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पुढील कारवाईसाठी भोसरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

आरोपीच्या सखोल तपासादरम्यान तो अट्टल रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले. यापूर्वी त्याने ‘म्हाडा’मध्ये स्वस्त घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक नागरिकांची २२,४१,७६० रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ३३/२०२५, बीएनएस (BNS) कलम ३१८ (४), ३३६ (३), ३३८, ३४० (२) अन्वये आधीच गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस हवालदार प्रदीप पोटे, प्रदीप गोडांबे, किरण जाधव आणि किशोर कांबळे यांच्या पथकाने आरोपीला जेरबंद केले.
“नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या सरकारी नोकरीच्या किंवा अनधिकृत आमिषांना बळी पडू नये. अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या भामट्यांपासून सावध राहावे.”— पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
