5
शिक्षक दिनानिमित्त ब्रह्मदत्त विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षकांचा विशेष सत्कार; उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते गौरव!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी सुनील पोकरे, दि. १५ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: ज्येष्ठ नागरिक क्रीडा संघ, निगडी यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून ब्रह्मदत्त विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या विशेष शिक्षकांचा शानदार सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर मा. सौ. शर्मिलाताई राजू बाबर यांच्या शुभहस्ते या समर्पित शिक्षकांचा विशेष गौरव करण्यात आला.

या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपमहापौर सौ. शर्मिलाताई बाबर म्हणाल्या, “शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे खरे मार्गदर्शक असतात. विशेषतः दिव्यांग आणि विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक जे धैर्य आणि प्रेमाने योगदान देतात, ते अत्यंत मोलाचे आहे. अशा विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने जगण्याची, शिक्षण घेण्याची आणि स्वावलंबनाची दिशा देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.”
या प्रसंगी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण प्रगतीसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या खालील मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. रावसाहेब कांबळे (मुख्याध्यापक, ब्रह्मदत्त विद्यालय) , रविंद्र जोशी (शिक्षक), मालती तिडके (शिक्षिका), सविता रोडे (सेविका), प्रतीक कुंभार (सेवक)
या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक क्रीडा संघाचे अध्यक्ष सुरेश कारंडे, उपाध्यक्ष शंकर होनकळस, सचिव गजानन श्रीखंडे, खजिनदार चंद्रकांत तेली यांच्यासह संघाचे सर्व सन्माननीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष शंकर होनकळस यांनी केले, तर उपस्थितांचे आभार खजिनदार चंद्रकांत तेली यांनी मानले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित या भावूक आणि प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

