48
पुण्यात बिल्डरची फसवणूक करत ९३ गुंठे जमिनीचा परस्पर व्यवहार; रुपाली चाकणकरांच्या दिरासह दोघांवर गुन्हा दाखल!
पुणे/पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १४ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे: वडिलोपार्जित जमिनीचा ८ कोटी रुपयांचा सौदा करायचा, त्यापोटी २ कोटी ३५ लाख रुपये उकळायचे आणि व्यवहार मोडल्यानंतर घेतलेले सर्व पैसे परत मिळवूनही मूळ मालकाला पूर्णपणे अंधारात ठेवून तीच ९३ गुंठे जमीन तिसऱ्याच व्यक्तीला परस्पर विकायची, असा एक धक्कादायक व चटका लावणारा फसवणुकीचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.
बिबवेवाडी येथील बांधकाम व्यावसायिक प्रविण प्रतापराव जगताप (वय ५५) यांची भोर तालुक्यातील कासुर्डी येथील मोक्याच्या जमिनीचा सौदा करताना ही मोठी फसवणूक झाली आहे. या प्रकरणी पुणे शहर पोलिसांच्या नांदेड सिटी पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरोधात विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नेत्या रुपाली चाकणकर यांचे दीर विक्रम विलास चाकणकर (रा. गारमळा, धायरी) आणि अक्षय रमेश मोरे (रा. न्यू कोपरे, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३३८, ३३६(२), ३१८(४), ३४०(२) आणि ३(५) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
फिर्यादी प्रविण जगताप व त्यांच्या आई सिंधू जगताप यांच्या संयुक्त नावावर कासुर्डी (ता. भोर) येथे गट क्रमांक ३५० मध्ये ०.९३.३२ हेक्टर (९३ गुंठे) जमीन आहे. मार्च २०२३ मध्ये धायरीतील एका हॉटेलमध्ये विक्रम चाकणकर याच्याशी भेट होऊन या जमिनीचा व्यवहार ८ कोटी रुपयांना ठरला होता.
चाकणकरने सुरुवातीला १ कोटी ८५ लाख रुपये रोख व धनादेशाद्वारे दिले. नंतर जगताप यांच्या मुलीच्या लग्नासाठी पैशांची गरज असल्याने चाकणकरने त्याचा मित्र सचिन मधुकर सुर्वे याला भागीदार करून त्याच्याकडून ५० लाख रुपये देववले. अशा प्रकारे जगताप यांना एकूण २ कोटी ३५ लाख रुपये मिळाले होते.
चाकणकर आणि सुर्वे यांच्यात अंतर्गत वाद झाल्याने त्यांनी व्यवहार रद्द करण्याची मागणी केली. त्यामुळे जगताप यांनी २६ मार्च २०२६ रोजी विसार पावती व समजुतीचा करारनामा रद्द करून संपूर्ण २ कोटी ३५ लाख रुपये बँक डी.डी. (D.D.) द्वारे त्यांना परत केले. ३० मार्च २०२६ रोजी वर्तमानपत्रात जाहीर नोटीस देऊन हा व्यवहार अधिकृतपणे संपुष्टात आला. व्यवहार रद्द झालेला असतानाच, डिसेंबर २०२५ मध्ये जगताप यांना एका वकिलामार्फत कायदेशीर नोटीस आली. अक्षय मोरे याने दावा केला की, विक्रम चाकणकर याने जुलै २०२२ मध्येच या जमिनीपैकी ३० आर क्षेत्र त्याला विकण्याचे ठरवून २० लाख रुपये घेतले होते. तसेच मोरेने २ मार्च २०२६ रोजी दीवाणी न्यायालयात खटलाही ठोकला. कोर्टातील कागदपत्रांची पडताळणी केली असता, मूळ मालकांशी कोणतीही ओळख वा कागदपत्रे नसताना चाकणकर व मोरे यांनी संगनमत करून १६ जुलै २०२२ रोजी जमिनीची बनावट कराराची कागदपत्रे तयार केल्याचे स्पष्ट झाले.
गुन्हा दाखल झालेला आरोपी विक्रम चाकणकर याला यापूर्वी सिंहगड रस्त्यावरील ब्रह्मा हॉटेल ते खेड शिवापूर पोलिस चौकीदरम्यान १८ जुलै रोजी घडलेल्या १ कोटी रुपयांच्या दरोड्याच्या प्रयत्न प्रकरणातही पोलिसांनी अटक केली होती.
“९३ गुंठे जमिनीचा व्यवहार बांधकाम व्यावसायिक प्रवीण जगताप आणि विक्रम चाकणकर यांच्यात झाला होता. हा व्यवहार मोडल्यानंतर जगताप यांनी घेतलेली रक्कम पूर्ण परत केली होती. तरीसुद्धा चाकणकरने ही जमीन अक्षय मोरे याला २० लाख रुपये घेऊन परस्पर विकली. या प्रकरणी संशयित आरोपी अक्षय मोरे यास ताब्यात घेण्यात आले असून प्रकरणाचा पुढील सखोल तपास सुरू आहे.”— प्रसाद अरुण राऊत, पोलीस निरीक्षक (नांदेड सिटी पोलीस ठाणे, पुणे)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
