शिवाजीनगर कोर्टाबाहेरील हल्ल्याचा कट शुभम चव्हाणच्या सख्ख्या भावानेच रचल्याचे उघड; सहा जण ताब्यात!
पुणे / पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २७ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे: शिवाजीनगर सत्र न्यायालय परिसराबाहेर बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) भरदिवसा झालेल्या गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणाला अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. २०२५ मध्ये पुण्याच्या कात्रज भागात जमिनीच्या वादातून हत्या झालेल्या शुभम चव्हाण याचा सख्खा भाऊ अक्षय चव्हाण यानेच या जीवघेण्या हल्ल्याचा कट रचल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा पूर्वनियोजित हल्ला केल्याचा संशय व्यक्त होत असून, पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
प्राथमिक तपासानुसार, आपल्या भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अक्षय चव्हाण याने १२ ते १५ तरुणांना एकत्र करून कट रचला आणि इतर आरोपींना सुपारी दिल्याचे पुढे आले आहे. शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी मंदार किवळे याला जामीन मिळाल्यानंतर त्याच्या हालचालींवर पाळत ठेवून ही संधी साधण्यात आली. २५ नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर सत्र न्यायालयाजवळ सहा जणांच्या टोळक्याने मंदार किवळेवर गोळीबार केला; सुदैवाने गोळीचा नेम चुकला. त्यानंतर पाठलाग करून कोयत्याने केलेल्या सपासप वारांत त्याचे दोन्ही हात गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर आरोपींनी परिसरात दहशत माजवण्यासाठी घोषणाबाजी केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. गुन्ह्याचा तपास करत पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
या घटनेनंतर मदतीसाठी कोणीही पुढे येत नसताना राजेश दामोदर काची यांनी धाडस दाखवत जखमी मंदार किवळे याला रिक्षातून तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांना माहिती देत तपासात सहकार्य केले. विविध घटनांमध्ये मदतीसाठी पुढे सरसावणाऱ्या काची यांच्या या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दुसरीकडे, घटना घडल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार दिवसभर घटनास्थळी न फिरकल्यावरून चर्चा रंगली आहे. ते जवळच असलेल्या शिवाजीनगर मुख्यालयात पोलिसांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत उपस्थित होते. ते न्यायालय आवाराची सुरक्षा पाहणी करून बैठक घेणार असले, तरी भरदिवसा घडलेल्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेचा तातडीने आढावा घेण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
