सांगवी येथील नूतनीकृत भारतीय संविधान शिल्पाचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. २७ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
सांगवी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ३२, सांगवी येथे नूतनीकरण करण्यात आलेल्या भारतीय संविधान शिल्पाचे संविधान दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) आमदार शंकर जगताप यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले. भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे हे शिल्प नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी यावेळी केले.
संविधान दिनाच्या शुभेच्छा देताना आमदार जगताप म्हणाले की, नव्याने नूतनीकरण झालेल्या संविधान शिल्पाचे आजच्या संविधान दिवशीच लोकार्पण होत आहे ही आनंदाची बाब आहे. संविधानाविषयी आदर, जागरूकता आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश या शिल्पाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचेल. या शिल्पामुळे शहराच्या लौकिकात भर पडणार असून भारतीय संविधानाचा गौरवशाली वारसा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लोकार्पण सोहळ्यानिमित्त उपस्थितांनी मान्यवरांच्या समवेत संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा तसेच सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार-अभिव्यक्ती-विश्वास-श्रद्धा-उपासना स्वातंत्र्य, दर्जा व संधीची समानता आणि बंधुता जपण्याचा निर्धार सर्वांनी केला.
या कार्यक्रमाला उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, ‘ह’ प्रभाग अध्यक्षा तृप्ती कांबळे, नगरसदस्य हर्षल ढोरे, नगरसदस्या पल्लवी जगताप, उज्वला ढोरे, नगररचना विभागाचे उपसंचालक ललित खोब्रागडे, माजी नगरसदस्य संतोष कांबळे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी संतोष कोराड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


