अॅडियन आणि युनिसेफच्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मंडळाची पिंपळे गुरव महापालिका शाळेला भेट!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २७ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शैक्षणिक उपक्रमांची, आधुनिक सुविधांची आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी अॅडियन (Adyen) फिनटेक कंपनी आणि युनिसेफ (UNICEF) यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मंडळाने पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेला भेट दिली. नेदरलँड्स, अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका येथील प्रतिनिधींचा या मंडळात समावेश होता. प्रतिनिधींनी शाळेतील वर्गखोल्या, डिजिटल शिक्षण व्यवस्था, ग्रंथालय, खगोलशास्त्र प्रयोगशाळा आणि STEM प्रयोगशाळांची पाहणी करून उपक्रमांची माहिती घेतली.
महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका शाळांमध्ये विविध सुविधा उभारण्यात आल्या आहेत. शिक्षण समिती सभापती रवीना आंगोळकर यांनी शाळांची शैक्षणिक वाटचाल, पायाभूत सोयीसुविधा आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तर शिक्षण अधिकारी संगीता बंगार यांनी प्रशासकीय कामकाज, शैक्षणिक नियोजन, व्यवस्थापन आणि विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती सादर केली. डिजिटल शिक्षण, ग्रंथालयाद्वारे वाचनसंस्कृती, खगोलशास्त्र प्रयोगशाळेद्वारे अवकाश विज्ञानाची गोडी आणि STEM प्रयोगशाळांतून विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणिताचे प्रात्यक्षिक ज्ञान देण्याच्या उपक्रमांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी भारतातील विविध राज्यांच्या संस्कृती, परंपरा आणि कलांचे दर्शन घडवणारा आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. तसेच शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यावर आधारित नाटक विद्यार्थ्यांनी संपूर्ण इंग्रजीत सादर केले, ज्याचे प्रतिनिधी मंडळाने कौतुक केले. विद्यार्थ्यांशी झालेल्या मुक्त संवादात विद्यार्थ्यांनी नेदरलँड्समधील शिक्षणपद्धती, तेथील अध्यापन पद्धती, भारत व नेदरलँड्समधील शिक्षणव्यवस्थेतील फरक आणि तेथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांबाबत उत्सुकतेने प्रश्न विचारले. प्रतिनिधींनी प्रश्नांची उत्तरे देत विद्यार्थ्यांना जागतिक शैक्षणिक दृष्टिकोन समजून घेण्याची संधी दिली. प्रतिनिधी मंडळाने शिक्षकांशी संवाद साधत अध्यापन पद्धती, आधुनिक शिक्षणतंत्र, अभ्यासक्रम अंमलबजावणी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण व कारणे यावर चर्चा केली. शिक्षकांनी शाळेतील वातावरण, नव्या पद्धती आणि आव्हानांची माहिती दिली.
या भेटीदरम्यान अॅडियन मुख्यालयाच्या सामंथा फिगुएरोआ, फेडेरिको फुस्को, मीरा ब्रँडसम, अॅडियन इंडियाच्या रूपा मित्तल आणि आदित्य खुल्लर, युनिसेफ नेदरलँड्सच्या मार्लोस ब्लूमर्ट, टिम कूप्स आणि स्कॉट कारेल, युनिसेफ इंडियाच्या सिंथिया मॅककॅफ्री, साधना पांडे, राधिका श्रीवास्तव, सयेम मेहमूद आणि संजय सिंह, तसेच युनिसेफ महाराष्ट्राच्या मानसी आचार्य, श्रीविद्या मेंढळे, श्रुती गणपत्ये आणि शिखा राणा उपस्थित होते.
महापालिकेच्या वतीने शिक्षण समिती सभापती रवीना आंगोळकर, प्रशासन अधिकारी संगीता बंगार, पर्यवेक्षिका ज्योती तापकीर, एससीईआरटीचे गणित विभागप्रमुख मनीष यादव, शिक्षण सहसंचालक रमाकांत काठमोरे, पिंपळे गुरव प्राथमिक शाळा क्र. ५४ च्या मुख्याध्यापिका गीतांजली पोळ आणि पिंपळे गुरव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग मूडगुण यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


