पीसीसीओईआरचे संशोधन रस्ते वाहतूक अपघात प्रसंगी उपयोगी; डॉ. के. एस. कृष्णा रेड्डी यांचे कौतुक!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २७ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (PCET) सचिव विठ्ठल काळभोर यांच्या अभिनव संकल्पनांवर आधारित ‘व्हेईकल क्लास बेस्ड सिक्वेन्शियल यू-टर्न जिओमेट्री’ आणि ‘स्ट्रिक्टली सेग्रिगेटेड मल्टी-डेक अर्बन ब्रिजेस’ या दोन प्रकल्पांच्या तांत्रिक विश्लेषणाची राष्ट्रीय व्यासपीठावर कौतुकास्पद नोंद घेतली गेली. तसेच पीसीसीओईआरचे संचालक डॉ. हरीश तिवारी यांच्या नेतृत्वात कार्यरत असणारे डीन (R&D) डॉ. सुदर्शन बोबडे यांची ‘स्मार्ट घाट रोड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टिम’ ही अभिनव संशोधन संकल्पना वाहनांच्या अपघात प्रसंगी खूप उपयोगी ठरेल, असे प्रतिपादन इंडियन रोड्स काँग्रेसचे (IRC) माजी अध्यक्ष तथा कर्नाटक सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव डॉ. के. एस. कृष्णा रेड्डी यांनी केले.
हैदराबाद येथील हायटेक प्रदर्शन केंद्र येथे नुकत्याच पार पडलेल्या इंडियन रोड्स काँग्रेसच्या ८५ व्या राष्ट्रीय वार्षिक अधिवेशनात रावेत येथील पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या (PCCOE&R) संशोधनाचे राष्ट्रीय स्तरावर कौतुक करण्यात आले. तांत्रिक सत्र क्रमांक २ (शैक्षणिक क्षेत्रासाठी) मध्ये ‘सुरक्षित घाट रस्ते आणि भारतातील शहरी वाहतूक व्यवस्थापनासाठी स्मार्ट वाहतूक प्रणाली’ या विषयावर डॉ. तिवारी व डॉ. बोबडे यांनी संयुक्तपणे सादरीकरण केले. या सत्राचे अध्यक्ष डॉ. के. एस. कृष्णा रेड्डी तर सह-अध्यक्ष सीएसआयआरचे वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक डॉ. मुक्ती अडवाणी होते. अधिवेशनास आयआयटी मुंबई, आयआयटी रोपार, आयआयटी कानपूर, आयआयटी हैदराबाद आणि एनआयटी वारंगल यांसारख्या संस्थांतील संशोधक व प्रतिनिधी उपस्थित होते.
पीसीईटीचे सचिव विठ्ठल काळभोर यांच्या संकल्पनांद्वारे शहरी वाहतुकीतील कोंडी आणि अपघातांची जोखीम कमी करण्याचे उपाय मांडण्यात आले. चौकात अवजड वाहनांच्या यू-टर्नमुळे होणारी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांब रांगा आणि सुरक्षेचे प्रश्न लक्षात घेऊन वाहनांच्या वर्गानुसार स्वतंत्र यू-टर्न मार्गांचा पर्याय सुचवण्यात आला आहे. हलक्या वाहनांसाठी आतील वळण मार्ग आणि अवजड वाहनांसाठी अधिक रुंद बाहेरील वळण मार्ग केल्यास वाहतुकीतील अडथळा घटून चौक अधिक सुरक्षित व वाहतूक सुरळीत होऊ शकते.वाढत्या शहरी वाहतुकीवर उपाय म्हणून वाहनांच्या प्रकारानुसार स्वतंत्र स्तरांवर वाहतूक विभागण्याची ही संकल्पना मांडली गेली. उन्नत स्तरावर हलक्या वाहनांसाठी स्वतंत्र पूल, त्याखाली अवजड वाहने व ट्रकसाठी स्वतंत्र मार्ग, तर जमिनीवरील सेवा रस्त्यांवर दुचाकी, तीनचाकी, स्थानिक बस व कमी अंतराच्या वाहतुकीसाठी व्यवस्था अशी याची रचना आहे. संरचनात्मक विश्लेषणानुसार लाईव्ह लोड मोमेंटमध्ये अंदाजे ७५ ते ८० टक्क्यांपर्यंत घट आणि अधिसंरचनेच्या बांधकाम खर्चात ३५ ते ४५ टक्क्यांपर्यंत बचतीची शक्यता या अभ्यासातून अधोरेखित झाली आहे.
डॉ. सुदर्शन बोबडे यांनी घाटरस्त्यांवरील तीव्र वळणे, अरुंद रस्ते, भूस्खलन, अपुरी दूरसंचार व्यवस्था आणि अपघातानंतर वाहनाचा शोध घेण्यात होणारा विलंब या समस्यांवर स्मार्ट तंत्रज्ञानाधारित उपाय मांडले. धोकादायक घाट वळणांवरील वाहनांचे निरीक्षण, माहिती संकलन आणि आपत्कालीन संदेश वहनाची एकात्मिक व्यवस्था उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून, त्यासाठी जीआयएस (GIS), एआय (AI) आणि आयओटी (IoT) तंत्रज्ञानाचा वापर सुचवण्यात आला आहे. ‘टाईम-बाउंड इंटेलिजंट व्हेईकल अकाउंटेबिलिटी सिस्टिम’ अंतर्गत जीआयएस आधारित धोकादायक ठिकाणांची ओळख, एएनपीआर (ANPR) कॅमेऱ्यांद्वारे वाहन क्रमांकाची स्वयंचलित नोंद आणि निर्धारित वेळेनुसार वाहनांचा मागोवा घेतला जातो. वाहन निर्धारित वेळेत पुढील निरीक्षण केंद्रावर न पोहोचल्यास स्वयंचलित अलर्ट तयार होऊन शेवटचा ज्ञात ठावठिकाणा शोधण्यास मदत होते, ज्यामुळे शोध व बचाव कार्याला गती मिळू शकते. आंबेनळी घाटासारख्या धोकादायक घाट मार्गांवर या प्रणालीचा प्रायोगिक वापर करण्याची संकल्पनाही मांडण्यात आली आहे.
या राष्ट्रीय स्तरावरील कामगिरीबद्दल पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी संचालक डॉ. हरीश तिवारी व डीन (R&D) डॉ. सुदर्शन बोबडे यांचे अभिनंदन केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


