कामगार चळवळ राजकारणविरहित असावी; कामगारांची वज्रमूठ होणे गरजेचे — डॉ. भारती चव्हाण
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २७ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: कामगारांच्या न्याय हक्कांसाठी तसेच आर्थिक व सामाजिक सुरक्षेसाठी अनेक उद्योगांत कामगार संघटना सातत्याने लढा देत असतात. कामगारांचे संघटन आणि नेतृत्व सक्षम असेल तर अनेक लढ्यात यश मिळते; मात्र ज्या लढ्यात राजकारण शिरते, तेथील कामगार चळवळ संपुष्टात येते, असे अनेक दाखले आहेत. त्यामुळे कामगार चळवळ राजकारणविरहित असावी, असे प्रतिपादन गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी केले.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे मगर स्टेडियमच्या मोबदल्यात हस्तांतरित झालेल्या भूखंडाच्या विकासाबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) खराळवाडी, पिंपरी येथे निमंत्रित कामगार कार्यकर्ते आणि गुणवंत कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या सुरुवातीला २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना आणि शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
स्व. आण्णासाहेब मगर स्टेडियमच्या संदर्भातील ३४ वर्षांच्या संघर्षाचा आणि इतिहासाचा आढावा घेत डॉ. भारती चव्हाण म्हणाल्या की, पिंपरी-चिंचवड या कामगार नगरीत महापालिकेकडून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला देऊ केलेल्या भूखंडावर भव्य सांस्कृतिक भवन उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी गुणवंत कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत; मात्र येथे कामगारांच्या हिताचा पुरेसा विचार होत नसल्याचे दिसते. कामगारांच्या घामातून उभारलेल्या स्व. आण्णासाहेब मगर स्टेडियमसारख्या इतर योजनांचा लाभ कामगारांना मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यासाठी कामगारांची वज्रमूठ होऊन राजकारणविरहित एकत्र लढा देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त कामगारांनी राष्ट्रीय प्रवाहात सक्रिय राहावे, यासाठी मंडळाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. – महंमद शरीफ मुलाणी (कोषाध्यक्ष)
आगामी काळात उभारल्या जाणाऱ्या सांस्कृतिक भवनातून श्रमिकांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे हित जपले जावे तसेच त्याला विधायक कार्ये व दीर्घकालीन योजनांची जोड द्यावी. –राजेश हजारे (सचिव)
नियोजित सांस्कृतिक भवनाची रूपरेषा कशी असावी, याबाबत सविस्तर माहिती दिली. – तानाजी एकोंडे (कार्याध्यक्ष)
“इतिहास घडवणारी माणसे कधी इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसे कधीही इतिहास घडवू शकत नाहीत. आपल्याला इतिहास घडवायचा आहे. ‘कामगार हिताय, कामगार सुखाय’ याप्रमाणे कामगारांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.” – किरण देशमुख (अध्यक्ष, अल्फा लावल संघटना व प्रमुख निमंत्रक)
हा मेळावा अल्फा लावल संघटनेचे अध्यक्ष तथा प्रमुख निमंत्रक किरण देशमुख यांच्या पुढाकाराने गुणवंत कामगार कल्याण मंडळ, पिंपरी-चिंचवड शहरतर्फे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी महंमद शरीफ मुलाणी, राजेश हजारे, तानाजी एकोंडे, बाळासाहेब साळुंके, भरत शिंदे, ज्ञानेश्वर मलशेट्टी, प्रकाश यादव, शंकर नाणेकर, दीपक पवार, शिवाजी वलवणकर, आकाश पालकर, विजय बडगुजर, सुरेश शिंदे, प्रकाश हुंबे, मुस्तफा मुलाणी यांच्यासह अनेक युनियन प्रतिनिधी व कामगार कार्यकर्ते उपस्थित होते.
संयोजनात बाळासाहेब साळुंके, शिवराज शिंदे, अशोक सरतापे, नंदकुमार धुमाळ, पांडुरंग सुतार, विजय गुजर, विजय पाटील, पोपट भालेराव, दिलीप कोंडे, पंडितराव पवार, हेमंत पवार यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन महेंद्र गायकवाड यांनी केले, तर अण्णा गुरव यांनी आभार मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

