पिंपरी, दि. २८ एप्रिल, २०२५: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध समस्या व सूचना मांडल्या. शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये झालेल्या या सभेत एकूण ६७ तक्रारवजा सूचना प्राप्त झाल्या. नागरिक आणि प्रशासन यांच्यात थेट संवाद साधण्याच्या उद्देशाने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी ही जनसंवाद सभा आयोजित केली जाते.
आज ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’, ‘इ’, ‘फ’, ‘ग’ आणि ‘ह’ या आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये समन्वय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जनसंवाद सभा पार पडली. यात ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयात सर्वाधिक २१, ‘ब’ मध्ये ४, ‘क’ मध्ये ६, ‘ड’ मध्ये ६, ‘इ’ मध्ये १०, ‘फ’ मध्ये ३, ‘ग’ मध्ये १७ तक्रारी व सूचना नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मांडल्या. विशेष म्हणजे, ‘इ’ प्रभागात एकही तक्रार प्राप्त झाली नाही.

यावेळी नागरिकांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील नाल्यांची साफसफाई पूर्ण करण्याची मागणी प्रामुख्याने केली. तसेच, विविध ठिकाणी सुरू असलेल्या ड्रेनेज लाईन दुरुस्तीच्या कामांना गती देऊन ती लवकर पूर्ण करावी, पाणीपुरवठा योग्य दाबाने करावा, सार्वजनिक स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता राखावी, उद्यानांमधील तुटलेले व्यायामाचे साहित्य दुरुस्त करावे, फुटपाथवरील अतिक्रमणे हटवावी आणि रस्त्यांवरील बंद असलेले पथदिवे त्वरित दुरुस्त करावे, अशा विविध तक्रारवजा सूचना नागरिकांनी जनसंवाद सभेत मांडल्या.
दरम्यान, आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सेवा हक्क दिन आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या दशकपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्या सेवा हक्कांबाबत जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लोकसेवा हक्क दिनाची शपथ देखील घेतली. यामुळे नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
