नवी दिल्ली: NCERT ने इयत्ता सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मुघल साम्राज्याचा भाग वगळल्यानंतर आता अभिनेता आर. माधवन यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. ‘केसरी चॅप्टर २’ मध्ये भूमिका साकारलेल्या माधवन यांनी भारतीय शाळांमधील इतिहासाच्या अभ्यासक्रमावर प्रश्नचिन्ह उभे करत दक्षिणेकडील चोल, पांड्य आणि पल्लव यांसारख्या शक्तिशाली राज्यांवर पुरेसा भर न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
माधवन म्हणाले, “मी हे बोलून कदाचित अडचणीत येऊ शकतो, पण तरीही बोलेन. शाळेत असताना आम्ही मुघलांवर आठ धडे वाचले, हडप्पा आणि मोहेंजोदारो संस्कृतीवर दोन, ब्रिटिश राजवट आणि स्वातंत्र्य लढ्यावर चार, तर दक्षिणेकडील राज्ये – चोल, पांड्य, पल्लव आणि चेर यांच्यावर फक्त एकच धडा होता.”

या कालखंडांची तुलना करत माधवन पुढे म्हणाले, “ब्रिटिश आणि मुघलांनी आपल्यावर सुमारे ८०० वर्षे राज्य केले, पण चोल साम्राज्याचे अस्तित्व २४०० वर्षे जुने आहे,” असा दावा त्यांनी केला. (चोल राजवट सातव्या ते तेराव्या शतकापर्यंत म्हणजेच सुमारे ५०० वर्षे होती, तर ब्रिटिशांनी सुमारे २०० वर्षे आणि मुघलांनी उपखंडात सुमारे ३०० वर्षे राज्य केले.)
माधवन यांनी दक्षिणेकडील राज्यांच्या योगदानाला कमी लेखल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “ते सागरी प्रवासाचे आणि नौदल शक्तीचे जनक होते. त्यांचे मसाल्याचे मार्ग रोमपर्यंत पसरलेले होते. आपल्या इतिहासाचा तो भाग कुठे आहे? आपल्या शक्तिशाली नौदलाच्या मदतीने अंगकोर वाटपर्यंत मंदिरे बांधल्याचा उल्लेख कुठे आहे? जैन धर्म, बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म चीनमध्ये पसरले. कोरियातील लोक निम्म्याहून अधिक तामिळ बोलतात, कारण आपली भाषा तेवढी दूर पोहोचली होती. आणि आम्ही या सगळ्याला फक्त एका धड्यात गुंडाळले.”

माधवन यांनी शालेय इतिहासाच्या अभ्यासक्रमावर टीका करत असा दावा केला की, तामिळ ही जगातील सर्वात जुनी भाषा असूनही याबद्दल कोणालाही माहिती नाही. ते म्हणाले, “ही कोणाची कथा आहे? अभ्यासक्रम कोणी ठरवला? तामिळ ही जगातील सर्वात जुनी भाषा आहे, पण याबद्दल कोणालाही माहिती नाही. आपल्या संस्कृतीत दडलेल्या वैज्ञानिक ज्ञानाची आज खिल्ली उडवली जात आहे.”
NCERT च्या या बदलांवर आणि माधवन यांच्या प्रतिक्रियेवर आता शिक्षण क्षेत्रात आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
#आरमाधवन #NCERT #अभ्यासक्रम #मुघल #चोल #पांड्य #पल्लव #इतिहास #शिक्षण #भारत #तामिळ
