RBI ची मोठी कारवाई! ‘या’ ५ बँकांना ठोठावला दंड; ग्राहकांनी घाबरण्याची गरज नाही!
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नुकतीच देशातील पाच प्रमुख बँकांवर कठोर कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या बँकांना मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईमुळे बँकेच्या खातेधारकांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले असले, तरी ग्राहकांनी घाबरण्याची गरज नाही, असे स्पष्टीकरण जाणकारांनी दिले आहे.
यापूर्वी, चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला RBI ने काही सहकारी बँकांचे परवाने रद्द केले होते. आता पुन्हा एकदा पाच मोठ्या बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. RBI देशातील सर्व बँकांवर आणि NBFC कंपन्यांवर बारकाईने लक्ष ठेवून असते. बँकांना RBI च्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असते आणि जे बँक नियम मोडतात, त्यांच्यावर RBI कारवाई करते.

शुक्रवारी, RBI ने खालील पाच बँकांना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावला आहे:
- अॅक्सिस बँक: या बँकेला २९.६० लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. बँकेने “अवैधपणे आंतरविभागीय/ऑफिस अकाऊंट्स ऑपरेशन” संदर्भात RBI च्या निर्देशांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई झाली.
- बँक ऑफ महाराष्ट्र: या बँकेवर ३१.८० लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे. KYC (नो युवर कस्टमर) प्रक्रियेतील त्रुटींमुळे ही कारवाई झाली.
- आयसीआयसीआय बँक: देशातील दुसरी सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेला सर्वाधिक ९७.८० लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. बँकेने ‘सायबर सुरक्षा फ्रेमवर्क इन बँक्स’, ‘नो युवर कस्टमर (KYC)’ आणि ‘क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड – इश्यू आणि कंडक्ट’ संबंधित काही नियमांचे पालन न केल्याने ही कारवाई झाली.
- आयडीबीआय बँक: या बँकेवर ३१.८० लाख रुपये दंड लावण्यात आला आहे. बँकेने “किसान क्रेडिट कार्ड” अंतर्गत शेतीसाठी दिलेल्या अल्प मुदतीच्या कर्जावरील व्याज सवलतीच्या योजनांसंबंधी RBI च्या काही निर्देशांचे पालन केले नाही.
- बँक ऑफ बडोदा: या सरकारी बँकेला ६१.४० लाख रुपये दंड भरावा लागणार आहे. बँकेने “बँकिंग सेवांच्या” आणि “ग्राहक सेवांच्या” बाबतीत RBI च्या काही नियमांचे उल्लंघन केले आहे.

ग्राहकांवर काय परिणाम होणार?
या कारवाईचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार नाही, असे RBI ने स्पष्ट केले आहे. हा दंड बँकांनी नियमांचे पालन न केल्यामुळे त्यांच्यावर लावण्यात आला आहे आणि ही रक्कम केवळ बँकांकडून वसूल केली जाईल. त्यामुळे ग्राहकांना कोणतीही अतिरिक्त रक्कम भरावी लागणार नाही. तसेच, या कारवाईमुळे बँक आणि ग्राहकांमधील व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी कोणतीही चिंता करण्याची गरज नाही, असे तज्ञांनी सांगितले आहे.
RBI ची ही कारवाई बँकांना अधिक जबाबदारीने आणि नियमांनुसार काम करण्याची शिकवण देणारी आहे.
या कारवाईबद्दल तुमचे काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा!
