पाकिस्तानी महिलेशी लग्न: बडतर्फ CRPF जवान मुनीर अहमद कोर्टात धाव घेणार!
श्रीनगर: पाकिस्तानी महिलेशी विवाह केल्यामुळे बडतर्फ करण्यात आलेले CRPF जवान मुनीर अहमद आता या कारवाईविरोधात न्यायालयात दाद मागणार आहेत. त्यांनी असा दावा केला आहे की, त्यांनी नियमांनुसारच सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती आणि आता न्याय तसेच पुन्हा सेवेत रुजू होण्यासाठी ते कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहेत.
जम्मूचे रहिवासी असलेल्या मुनीर अहमद यांनी मे २०२४ मध्ये पाकिस्तानमधील त्यांची चुलत बहीण मीनल खान हिच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लग्न केले. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “CRPF मुख्यालयाकडून परवानगी मिळाल्यानंतरच, माझ्या कर्करोगग्रस्त वडिलांची ढासळती तब्येत पाहता, व्हिसा प्रक्रियेची वाट न पाहता कुटुंबीयांनी ऑनलाइन पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या उपचाराचा खर्च CRPF ने उचलला होता.”
पहलगाम हल्ल्यानंतर सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे निर्देश देण्यात आले होते, त्यानंतर हा वाद समोर आला. मीनल २८ फेब्रुवारी रोजी अल्पकालीन व्हिसावर जम्मू-काश्मीरमध्ये आली होती आणि तिने मुनीरसोबत दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज केला होता. मात्र, ३० एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने तिच्या deport करण्याच्या कारवाईला स्थगिती दिली.
मुनीर यांनी सांगितले की, “माझी पत्नी माझ्या मामाची मुलगी आहे, जे १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी जम्मूहून पाकिस्तानात गेले. आमची भेट सोशल मीडिया किंवा ऑनलाइन झाली नाही, हे खोटं आहे.” २०१७ मध्ये CRPF मध्ये भरती झालेल्या मुनीर यांनी दावा केला की, पाकिस्तानी नागरिकाशी लग्न करण्याच्या त्यांच्या इच्छेबद्दल त्यांनी ३१ डिसेंबर २०२२ रोजी पहिल्यांदा अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला होता.
ते पत्रकारांना म्हणाले, “मला एका पाकिस्तानी महिलेशी लग्न लपवल्याच्या आरोपाखाली बडतर्फ करण्यात आले. पण मी विभागाला याबाबत माहिती दिली होती आणि सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. मी पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना न्यायाची मागणी करतो. मी कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहे.”
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मुनीर म्हणाले, “मी २०२२ मध्ये विभागाकडे लग्नाची परवानगी मागितली होती, पण त्याला उशीर झाला. त्यानंतर २४ मे २०२४ रोजी मी मीनल नावाच्या पाकिस्तानी महिलेशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लग्न केले. मी अधिकाऱ्यांना याची माहिती दिली आणि लग्नाचे आमंत्रण, ठिकाणाची माहिती आणि तिचा व्हिसा यासह सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली.”
३ मे २०२५ रोजी CRPF ने मुनीरला सेवेतून बडतर्फ केले. त्यांनी विवाह लपवला आणि एका पाकिस्तानी नागरिकाला भारतात बेकायदेशीरपणे ठेवले, जे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहे, असे CRPF ने म्हटले आहे. मीनलला ३० एप्रिल रोजी अटारी सीमेवर deport करण्यासाठी नेण्यात आले होते, परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ते थांबले.
मुनीर यांनी पुढे म्हटले, “मी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना विनंती करतो की माझ्यासोबत न्याय व्हावा. माझ्यासोबत जे काही होत आहे, त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. मी विभागाला माहिती दिली होती. अचानक हे सर्व घडत आहे. आधी व्हिसावरून आणि आता माझ्या नोकरीवरून. आम्ही खूप अडचणीत आहोत. म्हणूनच आम्ही पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे न्याय मागत आहोत.”
आता या प्रकरणी मुनीर अहमद न्यायालयात काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागलेले आहे.
या घटनेवर तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा!
