Home पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड पोलिसांनी २६ सराईत गुन्हेगारांवर केली हद्दपारची कठोर कारवाई!

पिंपरी चिंचवड पोलिसांनी २६ सराईत गुन्हेगारांवर केली हद्दपारची कठोर कारवाई!

परिमंडळ III कडून मे २०२५ मध्ये २६ जणांना जिल्ह्याबाहेर; गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्यासाठी आयुक्तांच्या आदेशाने धडक मोहीम, शहरात शांतता आणि सुरक्षितता राखण्याचा पोलिसांचा निर्धार! (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी चिंचवड)

by maxmanthannews@gmail.com

पिंपरी चिंचवड पोलिसांनी २६ सराईत गुन्हेगारांवर केली हद्दपारची कठोर कारवाई!

परिमंडळ III कडून मे २०२५ मध्ये २६ जणांना जिल्ह्याबाहेर; गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्यासाठी आयुक्तांच्या आदेशाने धडक मोहीम! (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी चिंचवड)

पिंपरी चिंचवड, ०५ जून २०२५: पिंपरी चिंचवड शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस दलाने कठोर पाऊल उचलले आहे. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ III, पिंपरी चिंचवड यांच्या कार्यालयाने मे २०२५ मध्ये एकूण २६ सराईत गुन्हेगारांवर ‘हद्दपार’ (Externment) ची कारवाई केली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५, ५६ व ५७ प्रमाणे ही कारवाई करण्यात आली असून, गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्याचा आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्याचा पोलिसांचा निर्धार यातून दिसून येतो.

आयुक्तांच्या आदेशाने धडक कारवाई

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे (भा.पो.से.) आणि अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आवाड यांनी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर ठोस व परिणामकारक अशी कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस स्टेशनला दिले होते. या आदेशास अनुसरून परिमंडळ III कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनकडील खालील नमूद सराईत गुन्हेगारांना जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे. या कारवाईमुळे सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

हद्दपार करण्यात आलेले प्रमुख गुन्हेगार आणि त्यांच्यावरील गुन्हे

हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये २० ते ४५ वयोगटातील सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. काही प्रमुख गुन्हेगार आणि त्यांच्यावरील गुन्हे खालीलप्रमाणे:

  • महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे:
    • शरद ज्ञानेश्वर मोरे (वय २७): याच्यावर खून, जबरी चोरीचा प्रयत्न, प्राणघातक हत्यारानिशी दरोडा घालण्याचा प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण, बलादग्रहण, आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम अंतर्गत एकूण ०४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. याला पुणे जिल्हा हद्दीतून ०२ वर्षांसाठी हद्दपार केले आहे.
    • स्वयंम सबाजी सावंत (टोळी प्रमुख, वय २७) व सोनु बहिरु केदारी (टोळी सदस्य, वय २९): या दोघांवर घातक हत्यारांनी दुखापत पोहोचवणे, शांतता भंग करणे, धाकधपटशा, ॲसिडचा वापर करून दुखापत करणे, तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत अवैध दारू विक्रीचे एकूण ०६ गुन्हे दाखल आहेत. त्यांना पुणे जिल्हा हद्दीतून ०१ वर्षांसाठी हद्दपार केले आहे.
  • चिखली पोलीस ठाणे:
    • संग्राम दत्तात्रय पवार (वय २९): याच्यावर दरोडा, खुनाचा प्रयत्न, दुखापतीची भीती घालून बलादग्रहण, दहशत माजवणे आणि मनाई आदेशाचा भंग करणे यासारखे एकूण ०२ गुन्हे दाखल आहेत. याला पुणे जिल्हा हद्दीतून ०२ वर्षांसाठी हद्दपार केले आहे.
    • आकाश उर्फ सुमित उर्फ आक्या बौड पांडुरंग मोहळ (वय १९): याच्यावर खुनाचा प्रयत्न, दुखापत पोहोचवणे, बेकायदेशीर जमावात सामील होणे, दंगा करणे यासारखे ०२ गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, हा विधीसंघर्षित बालक असतानाही त्याचेवर इतर १४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. याला पुणे जिल्हा हद्दीतून ०२ वर्षांसाठी हद्दपार केले आहे.
    • रोहन शंकर पंडीत (वय २३): याच्यावर जबरी चोरी, घातक हत्यारासह दहशत माजवणे आणि मनाई आदेशाचा भंग करणे असे एकूण ०२ गुन्हे दाखल आहेत. याला पुणे जिल्हा हद्दीतून ०२ वर्षांसाठी हद्दपार केले आहे.
    • मारुती मांजरिया राठोड (वय ४५): याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत बेकायदेशीररित्या हातभट्टी दारू तयार करून विक्री करणे तसेच इतर कायद्यांतर्गत एकूण ०६ गुन्हे दाखल आहेत. याला पुणे जिल्हा हद्दीतून ०२ वर्षांसाठी हद्दपार केले आहे.
  • एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे:
    • जिके ऊर्फ गणेश संतोष कोठावळे (टोळी प्रमुख, वय १९), ससा ऊर्फ प्रतिक कैलास गजरमल (टोळी सदस्य, वय १९), रोहित राजु बजलव (टोळी सदस्य, वय २१), व्हि पी ऊर्फ विशाल हणमंत पोळ (टोळी सदस्य, वय २९), बच्चा ऊर्फ दिग्वीजय अनंत गायकवाड (टोळी सदस्य, वय १९): या टोळीवर खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गैरपणे निरुद्ध करणे, घातक हत्यारांनी दुखापत पोहोचवणे, बेकायदेशीर जमावात सामील होणे, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत आणि दहशत माजवणे यासारखे एकूण ०४ गुन्हे दाखल आहेत. यांना पुणे जिल्हा हद्दीतून ०२ वर्षांसाठी हद्दपार केले आहे.
    • केतन सोनवणे ऊर्फ चेप्या (वय २६): याच्यावर खुनाचा प्रयत्न, गैरपणे निरुद्ध करणे, बेकायदेशीर जमावात सामील होणे, दंगा करणे, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत आणि मनाई आदेशाचा भंग करणे असे एकूण ०२ गुन्हे दाखल आहेत. याला पुणे जिल्हा हद्दीतून ०२ वर्षांसाठी हद्दपार केले आहे.
    • जयंता हरिपद सरकार (वय २९): याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत बेकायदेशीररित्या दारू विक्रीचे एकूण ०७ गुन्हे दाखल आहेत. याला पुणे जिल्हा हद्दीतून ०२ वर्षांसाठी हद्दपार केले आहे.
  • दिघी पोलीस ठाणे:
    • गजानन गोविंद भोसले (वय २८): याच्यावर पत्नीस क्रूरतेची वागणूक देणे, दुखापत पोहोचवणे, शांतता भंग करणे आणि बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधि. २०१२ अंतर्गत एकूण ०३ गुन्हे दाखल आहेत. याला पुणे जिल्हा हद्दीतून ०२ वर्षांसाठी हद्दपार केले आहे.
    • सौ. नंदा रंगनाथ साळुंके (वय ५०): या महिलेवर एनडीपीएस कायद्यांतर्गत बेकायदेशीररित्या गांजा विक्रीचे एकूण ०४ गुन्हे दाखल आहेत. यांना पुणे जिल्हा हद्दीतून ०२ वर्षांसाठी हद्दपार केले आहे.
    • विजय बाळासाहेब साळवे (टोळी प्रमुख, वय २२) व ज्ञानेश्वर वसंत दुनघव (टोळी सदस्य, वय २२): या टोळीवर घातक हत्यारांनी दुखापत पोहोचवणे, फौजदारीपात्र गृह अतिक्रमण, जबरी चोरी करताना दुखापत करणे, दरोडा यासारखे एकूण ०४ गुन्हे दाखल आहेत. यांना पुणे जिल्हा हद्दीतून ०१ वर्षासाठी हद्दपार केले आहे.
  • चाकण पोलीस ठाणे:
    • अक्षय नंदू पठारे (वय २०): याच्यावर घातक हत्याराने दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न, शांतता भंग करणे, बेकायदेशीर जमावात सामील होणे आणि दहशत माजवणे यासारखे एकूण ०३ गुन्हे दाखल आहेत. याला पुणे जिल्हा हद्दीतून ०२ वर्षांसाठी हद्दपार केले आहे.
  • निगडी पोलीस ठाणे:
    • सचिन बाळू धांडे (टोळी प्रमुख, वय २०), दिपक गोरख धांडे (टोळी सदस्य, वय २४), राहुल भारत जाधव (टोळी सदस्य, वय २०): या टोळीवर खुनाचा प्रयत्न, दुखापत पोहोचवणे, शांतता भंग करणे, धाकधपटशा आणि दहशत माजवणे यासारखे एकूण ०३ गुन्हे दाखल आहेत. यांना पुणे जिल्हा हद्दीतून ०२ वर्षांसाठी हद्दपार केले आहे.

आजवरची आकडेवारी आणि पोलिसांचे आवाहन

माहे मे २०२५ मध्ये एकूण १७ हद्दपार आदेश पारित करून त्यात एकूण २६ आरोपींना हद्दपार करण्यात आले आहे. तसेच, परिमंडळ- III, पिंपरी चिंचवड कार्यालयाकडून जानेवारी २०२५ ते मे २०२५ पर्यंत एकूण ७७ हद्दपार आदेश पारित करून त्यात एकूण ९१ आरोपींना हद्दपार करण्यात आले आहे. परिमंडळ III, पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील १०० हून अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे. सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून परावृत्त करण्यासाठी आणि गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस दल ठोस व परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे.

डॉ. शिवाजी पवार, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ III, पिंपरी चिंचवड, यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, उपरोक्त हद्दपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार त्यांच्या हद्दपार कालावधीत पुणे जिल्ह्यात दिसल्यास, तात्काळ नियंत्रण कक्ष संपर्क क्र. ११२ तसेच जवळील संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती कळवावी.

© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!