पिंपळे सौदागर-रहाटणीच्या प्रशासकीय गुंत्यात शिवराज नगर ‘अडकले’! स्मार्ट सिटी असूनही नागरिकांचे हाल; युवा नेते राकेश नखाते यांची प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!
खराब रस्ते, अपूर्ण ड्रेनेज कामे आणि वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त; ‘स्मार्ट सिटी काय असते, ते आम्हालाही दिसावे!’ शिवराज नगरवासियांची आर्त हाक.
पिंपरी-चिंचवड, १३ जून २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर आणि रहाटणी प्रभाग वेगवेगळ्या प्रशासनांतर्गत येत असल्याने, शिवराज नगरचा परिसर दुहेरी प्रशासकीय विळख्यात सापडला आहे. अर्धा भाग स्मार्ट सिटी अंतर्गत पिंपळे सौदागर प्रभागात, तर अर्धा भाग रहाटणी-काळेवाडी प्रभागात येतो. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, विशेषतः सध्या नगरसेवक नसल्यामुळे प्रशासनाकडे थेट न्याय मागण्यातही समस्या येत आहेत. युवा नेते राकेश नखाते यांनी या परिस्थितीवर प्रकाश टाकत प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
‘स्मार्ट सिटी’ असूनही नागरिकांचे हाल!
राकेश नखाते यांनी सांगितले की, सध्या सर्वात मोठी अडचण ही धर्मवीर संभाजी महाराज उद्यानाकडून येणाऱ्या १२ मीटर रस्त्याची आहे, जो शिवराज नगरमधून जातो. हा रस्ता तातडीने विकसित करणे ही काळाची गरज आहे. पूर्वी ही एक पायवाट होती आणि अजूनही तीच स्थिती असल्याने रस्ता अत्यंत अरुंद आहे, जरी डीपी (विकास आराखडा) मध्ये तो १२ मीटर आरक्षित असला तरी.
तात्काळ रस्ते रुंदीकरण व अपूर्ण कामांचा प्रश्न
स्वामी समर्थ मठाजवळ दोन-अडीच महिन्यांपूर्वी ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यात आली होती, परंतु ते काम अजूनही अपूर्ण आहे. तिथे राडारोडा तसाच पडून आहे आणि खड्डे पडले आहेत, ज्यामुळे वाहनधारकांना आणि पादचाऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. नागरिकांचे या त्रासामुळे हाल झाले आहेत. राकेश नखाते यांनी संबंधित ठेकेदार किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याला हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती केली आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक कोंडीचा ‘महाजाळ’: विद्यार्थ्यांनाही भुर्दंड!
गेल्या पाच ते दहा वर्षांमध्ये शिवराज नगरमध्ये हजारो नवीन लोक रहिवासी झाले आहेत. यामुळे १२ मीटर रस्त्याचे रुंदीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार, या रस्त्यावर एका वेळी केवळ एकच गाडी जाऊ शकते, दुसरी गाडी पास होऊ शकत नाही, अशी भयंकर परिस्थिती आहे. यामुळे किमान अर्धा ते एक तास तात्काळत उभे राहावे लागते.
सर्व शाळा-कॉलेज सुरू झाल्यामुळे लहान मुले आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या बसेसनाही या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. बसमधून प्रवास करणाऱ्या मुलांना घरी पोहोचायला एक ते दीड तास उशीर होतो. सोसायटीधारक आणि सर्व नागरिकांना या भयानक वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. भेळ चौक सिग्नल आणि संभाजी चौक सिग्नल येथे वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याने आणि ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त केले जात नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.
राकेश नखाते यांनी प्रशासनाला या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन, १२ मीटर रस्ता लवकरात लवकर विकसित करण्याची मागणी केली आहे. “स्मार्ट सिटी काय असते, ते आम्हा शिवराज नगरमधील नागरिकांनाही दिसावे,” अशी आर्त हाक त्यांनी प्रशासनाला दिली आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने पाऊले उचलणे ही काळाची गरज आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
