अहमदाबाद विमान अपघातात पुन्हा दुर्दैव! लग्नाच्या अवघ्या दोनच दिवसांनी नवविवाहित वराचा करुण अंत; ‘त्या’ महिलेचे सिंदूर पुसले!
अहमदाबादहून लंडनकडे झेपावताना एअर इंडियाचे विमान कोसळले; वडोदरा येथील माहेश्वरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर!
अहमदाबाद, १४ जून २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): अहमदाबाद येथील विमानतळावर काल घडलेल्या एका भीषण विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. एअर इंडियाचे एक प्रवासी विमान झेप घेताच काही क्षणांत त्याचा संपर्क तुटला आणि त्यानंतर काही मिनिटांतच ते कोसळले. या दुर्घटनेत विमानात सुमारे २५० प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. एआय १७१ (AI 171) हे बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर प्रकारचे विमान अहमदाबादहून लंडनकडे रवाना होत होते, मात्र नियतीने त्याचा प्रवास अर्ध्यावरच थांबवला.
लग्नाच्या अवघ्या दोन दिवसांतच नियतीचा क्रूर घाला
या अपघातात वडोदरा शहरातील वाडी भागात राहणाऱ्या माहेश्वरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कुटुंबात अवघ्या दोन दिवसांपूर्वीच लग्नाचे आनंदी वातावरण होते. या कुटुंबातील भाविक माहेश्वरी याचे दहा जून रोजी कोर्ट मॅरेज झाले होते. मात्र, लग्नाच्या केवळ दोनच दिवसांनंतर भाविकचा अहमदाबादमधील या विमान अपघातात मृत्यू झाल्याने या घरात आता शोककळा पसरली आहे.
हसऱ्या निरोपाचे अखेरच्या निरोपात रूपांतर
भाविक माहेश्वरी मागील बऱ्याच वर्षांपासून लंडनमध्ये काम करत होता. तो दरवर्षी १५ दिवसांसाठी आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी वडोदरा येथे यायचा. त्याचे लग्न आधीच ठरले होते आणि कुटुंबातील सदस्यांच्या संमतीने त्यांचे कोर्ट मॅरेज झाले होते. लग्नानंतर वडोदराहून परत लंडनला त्याचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी त्याच्या नवविवाहित पत्नीने त्याला हसत हसत निरोप दिला. मात्र, आपल्या पतीला असा निरोप देण्याची ही शेवटची वेळ असेल असा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. फ्लाईटमध्ये चढल्यानंतर काही तासांतच एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच क्रॅश झाल्याची बातमी समोर आली आणि याच विमानात भाविक प्रवास करत होता.
माहेश्वरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर
या हृदयद्रावक बातमीमुळे माहेश्वरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भाविकच्या मृत्यूवर त्याच्या वडिलांचा अजूनही विश्वास बसत नाहीये. त्यांच्या कुटुंबात आणि नातलगांमध्ये तीव्र शोककळा पसरली असून, या अपघाताने एका नवविवाहित जोडप्याच्या स्वप्नांचा आणि एका कुटुंबाच्या आनंदाचा क्षणार्धात अंत केला आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.