“कष्टकरी व गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला!” सांगवी केसरी महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याची काँग्रेसची आग्रही मागणी
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, १८ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील अत्यंत जुने, नावाजलेले आणि गरीब-मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरलेले ‘सांगवी केसरी महाविद्यालय’ ची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्यामुळे शेकडो विद्यार्थी आणि पालकांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. बारावीचा निकाल लागून अनेक दिवस उलटले तरीही प्रवेशाबाबत कोणतीही हालचाल न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे ढग जमा झाले आहेत.
या गंभीर नागरी समस्येची दखल घेऊन आज पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने थेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात धडक दिली आणि प्रभारी कुलगुरू डॉ. पराग काळकर यांची भेट घेऊन प्रवेश प्रक्रिया तात्काळ पूर्ववत सुरू करण्याबाबत सविस्तर निवेदनाद्वारे आग्रही मागणी केली.
काँग्रेस शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा करताना प्रभारी कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी सांगितले की, “सांगवी केसरी महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया रखडल्याबाबत विविध सामाजिक आणि शैक्षणिक स्तरातून आमच्याकडे सातत्याने मागण्या व तक्रारी प्राप्त होत आहेत. या तांत्रिक आणि प्रशासकीय प्रकरणाची गंभीर दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने संबंधित महाविद्यालयाला ‘कारणे दाखवा नोटीस’ (Show Cause Notice) बजावली आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची पूर्ण काळजी विद्यापीठ घेईल आणि लवकरच या महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया पूर्ववत सुरू होईल.”
प्रवेश प्रक्रिया रखडल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करताना काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले:
“मोहननगर, चिंचवड, दत्तनगर तसेच विद्यानगर व लगतच्या परिसरातील गरीब, होतकरू आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या कष्टकरी कुटुंबातील मुला-मुलींच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी ‘सांगवी केसरी महाविद्यालय’ हा एकमेव आणि मुख्य आधार आहे. कमी फी आणि घरच्या जवळ असलेल्या या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी दरवर्षी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. मात्र, यंदा ही प्रक्रिया रखडल्याने हुशार मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.”
ते पुढे म्हणाले, “काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज थेट मुख्य कुलगुरूंना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते सोमवारपर्यंत उपलब्ध नसल्यामुळे आम्ही प्रभारी कुलगुरू डॉ. पराग काळकर यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची भीषणता पटवून दिली. येत्या सोमवारी (दि. २२ जून) पुन्हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मुख्य कुलगुरू श्री. सुरेश गोसावी यांची आम्ही वैयक्तिक भेट घेणार असून, हे महाविद्यालय पूर्ण ताकदीने आणि नियमितपणे कसे सुरू राहील, याबाबत अंतिम निर्णय घेईपर्यंत काँग्रेस पक्ष या आंदोलनाचा व मागण्यांचा पाठपुरावा सोडणार नाही.”
गरीब विद्यार्थ्यांच्या या न्याय्य लढ्यासाठी विद्यापीठात धाव घेणाऱ्या काँग्रेसच्या शिष्टमंडळात खालील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. नरेंद्र बनसोडे (शहराध्यक्ष, पिंपरी-चिंचवड काँग्रेस), विल्यम साळवी (ज्येष्ठ काँग्रेस नेते व सामाजिक कार्यकर्ते), जितेंद्र छाबडा (माजी सरचिटणीस, काँग्रेस), हरीश डोळस (काँग्रेस नेते व प्रभाग संघटक)
या ऐतिहासिक पाठपुराव्यामुळे सांगवी केसरी महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया पुढील आठवड्याभरात गतीने सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली असून, स्थानिक गरीब विद्यार्थी व पालकांकडून काँग्रेसच्या या धडक भूमिकेचे स्वागत केले जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
