औद्योगिकनगरीत वाहणार ‘ज्ञानगंगा’! महापौर रवि लांडगे यांच्या क्रांतिकारी संकल्पनेतून पिंपरी-चिंचवडमध्ये साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘अक्षरविश्व’ ज्ञानसंकुल
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, १८ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराला आजवर केवळ आशिया खंडातील सर्वात श्रीमंत ‘औद्योगिकनगरी’ म्हणून ओळखले जात होते. मात्र, आता या शहराला केवळ कारखान्यांचे शहर न ठेवता ज्ञान, प्रगल्भ वाचन संस्कृती, साहित्यिक विचार आणि जागतिक दर्जाच्या संशोधनाचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनवण्याचा दृढ संकल्प महापौर रवि लांडगे यांनी केला आहे. त्यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि दूरदर्शी संकल्पनेतून भोसरी (कासारवाडी) येथे तब्बल ८,८३१.३६ चौरस मीटर आरक्षित जागेवर ‘अक्षरविश्व’ हे भव्य आणि अत्याधुनिक ज्ञानसंकुल साकारत आहे.
या ऐतिहासिक प्रकल्पाची सर्वात मोठी आणि अभिमानास्पद बाब म्हणजे, या प्रकल्पाच्या उभारणीसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्वनिधीतील एकही रुपया खर्च केला जाणार नाही. संपूर्ण ‘अक्षरविश्व’ प्रकल्प हा विविध बड्या कंपन्यांच्या ‘सीएसआर’ (Corporate Social Responsibility) निधीतून आणि दानशूर संस्थांच्या सहकार्यातून उभारला जाणार आहे. विशेष म्हणजे, या भव्य ज्ञानमंदिरासाठी निधी कमी पडल्यास स्वतःच्या खिशातून आर्थिक मदत करण्याची ऐतिहासिक घोषणा महापौर रवि लांडगे यांनी केली आहे. लोकप्रतिनिधी असावा तर असा, अशा शब्दांत आज शहरातील सुजाण नागरिकांमधून महापौरांचे कौतुक होत आहे.
हा केवळ पुस्तके कपाटात ठेवून बनवलेला साचा नसेल, तर हे एक जिवंत आणि आधुनिक शैक्षणिक केंद्र असेल. यामध्ये खालील जागतिक दर्जाच्या सुविधांचा समावेश असणार आहे:
- अत्याधुनिक ग्रंथालय व ई-लायब्ररी: लाखो दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह आणि संगणकीय सुविधेने सज्ज डिजिटल अभ्यासिका.
- स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्र: यूपीएससी (UPSC), एमपीएससी (MPSC) आणि राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या गरिबांच्या हुशार मुलांसाठी २४ तास वातानुकूलित अभ्यास केंद्र.
- संशोधन सुविधा व कवी-लेखक कट्टा: देश-विदेशातील विचारवंतांना शांततेत संशोधन करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था.
- मराठी साहित्य परिषद कार्यालय व चर्चासत्र सभागृह: लेखक, कवी आणि विचारवंतांमधील संवादासाठी स्वतंत्र व्यासपीठ.
- मनोमय कक्ष (Psychological Room): विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताणतणाव कमी करण्यासाठी विशेष समुपदेशन केंद्र.
- अत्याधुनिक व्याख्यान व पुस्तक प्रकाशन सभागृह: सांस्कृतिक प्रबोधनाचे मोठे कार्यक्रम घेण्यासाठी सुसज्ज सभागृह.
आजवर अनेक राजकीय नेते केवळ रस्ते, सिमेंटचे रस्ते, उड्डाणपूल आणि गटारांच्या कामांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत आले आहेत, कारण त्यात कंत्राटदारांचे आणि टक्केवारीचे हित असते. मात्र, भौतिक सुविधांसोबतच भावी पिढीच्या बौद्धिक विकासासाठी ज्ञानाचा भक्कम पाया रचणे अत्यंत गरजेचे आहे, हा अद्वितीय विचार महापौर रवि लांडगे यांनी प्रत्यक्ष कृतीत आणून दाखवला आहे.
१५ जून २०२६ रोजी पार पडलेल्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भोसरी परिसरातील मौजे भोसरी (कासारवाडी) येथील सार्वजनिक सुविधा क्षेत्रातील सुमारे ८,८३१.३६ चौरस मीटर मोकळी जागा या भव्य प्रकल्पासाठी देण्याच्या महापौरांच्या ऐतिहासिक उपसूचनेस सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. हा संपूर्ण प्रकल्प ‘आनंदग्राम सामाजिक सेवाभावी संस्था, भोसरी’ च्या वतीने राबवला जाणार आहे. नागरिकांवर किंवा महापालिकेवर एक नया पैशाचाही बोजा न टाकता इतका अथांग प्रकल्प उभा करणे, हे महापौरांच्या उत्कृष्ट प्रशासकीय नियोजनाचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
आज पिंपरी-चिंचवडमधील हुशार तरुण, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आणि संशोधक चांगल्या वाचनालयांच्या आणि अभ्यासिकेच्या शोधात पुणे शहर, मुंबई किंवा इतर महानगरांकडे धाव घेतात. मात्र, ‘अक्षरविश्व’ उभारणीनंतर विद्यार्थ्यांना आपल्याच शहरात सर्व सोयी-सुविधा मोफत व दर्जेदार स्वरूपात मिळतील. यामुळे पिंपरी-चिंचवड हे राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ‘ज्ञाननगरी’ आणि ‘वाचन संस्कृतीचे सर्वात मोठे केंद्र’ म्हणून उदयास येईल. महाराष्ट्रातील आणि देशातील नामवंत कवी, लेखक, शिक्षणतज्ज्ञ आणि कल्पक संशोधकांचे या शहरात पाय लागल्यामुळे औद्योगिकनगरीचे बौद्धिक वैभव अधिक समृद्ध होणार आहे.
या ऐतिहासिक स्वप्नावर बोलताना महापौर रवि लांडगे अत्यंत भावूक व आत्मविश्वासाने म्हणाले:
“औद्योगिक व श्रीमंत नगरी म्हणून संपूर्ण जगात मिरवणाऱ्या आपल्या पिंपरी-चिंचवडला आता ‘ज्ञाननगरी’ आणि ‘पुस्तकांची नगरी’ म्हणून नवी जागतिक ओळख मिळवून देणे, हेच ‘अक्षरविश्व’ प्रकल्पामागचे मुख्य ध्येय आणि माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे. सिमेंटची जंगले उभारण्यापेक्षा आपल्या भावी पिढ्यांचे भविष्य सुसंस्कृत आणि प्रगल्भ बनवण्यासाठी ज्ञानाचा कायमस्वरूपी ठेवा निर्माण करण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. ‘अक्षरविश्व’ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तो केवळ एका काँक्रीटच्या इमारतीपुरता मर्यादित राहणार नाही, तर पिंपरी-चिंचवडच्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि बौद्धिक पुनर्जागरणाचा सर्वात भक्कम पाया ठरेल. जर या मंदिरासाठी पैशांची कमतरता भासली, तर मी स्वतः माझ्या वैयक्तिक उत्पन्नातून यात आर्थिक भर घालेन, पण हा प्रकल्प जगभरात अद्वितीय बनवूनच दाखवेन!”
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
