news
दौंड-अहिल्यानगर हायवेवर बळीराजाचा संताप; मारुती भापकरांच्या नेतृत्वाखाली कोळगाव फाट्यावर भव्य ‘रास्ता रोको’!पीसीएमसी आयुक्तांचा कामचुकार अधिकाऱ्यांना सज्जड दम; नागरिकांच्या तक्रारी रेंगाळल्यास थेट निलंबनाची टांगती तलवार!सांगवी केसरी कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेसाठी काँग्रेस आक्रमक; थेट पुणे विद्यापीठात दिली धडक!पिंपरी मनपात ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटाच्या स्टारकास्टचा राबता; महापौर रवि लांडगे यांच्याकडून जंगी स्वागत!मुंबई-पुणे हायवेवरील कामांची उपमहापौर शर्मिला बाबर यांच्याकडून ऑन-द-स्पॉट पाहणी; निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची केली कानउघाडणी!
Home पिंपरी चिंचवड औद्योगिकनगरीत वाहतूक पोलिसांची मोठी ‘सर्जिकल स्ट्राईक’; १५ दिवसांत १.८५ कोटींचा विक्रमी दंड वसूल!

औद्योगिकनगरीत वाहतूक पोलिसांची मोठी ‘सर्जिकल स्ट्राईक’; १५ दिवसांत १.८५ कोटींचा विक्रमी दंड वसूल!

एकूण १९,०३५ बेशिस्त वाहनचालकांवर दणकेबाज कारवाई; नो पार्किंग आणि काळ्या काचावाल्यांना मोठा दणका, तक्रारींसाठी 'ट्राफिक बडी' व्हॉट्सॲप चॅट बॉट कार्यान्वित | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडमध्ये नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले! अवघ्या १५ दिवसांत १९,०३५ जणांवर कारवाई; १ कोटी ८५ लाखांचा विक्रमी दंड वसूल

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, १८ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून स्वैरपणे वाहन चालवणाऱ्या आणि शहरातील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी अत्यंत तीव्र स्वरूपाची ‘सर्जिक्स स्ट्राईक’ मोहीम सुरू केली आहे. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे यांच्या आदेशावरून १ जून ते १५ जून २०२६ या अवघ्या १५ दिवसांच्या पहिल्या पंधरवड्यात वाहतूक शाखेने तब्बल १९,०३५ वाहनचालकांवर विविध कलमांखाली दणकेबाज कारवाई केली आहे. या धडक कारवाईच्या माध्यमातून पोलिसांनी तब्बल १ कोटी ८५ लाख १३ हजार ३०० रुपयांचा विक्रमी दंड आकारला आहे. या मोहिमेमुळे शहरातील चौकाचौकांमध्ये बेशिस्त वाहनचालकांचे धाबे दणाणले असून, नियम पाळण्याकडेच नागरिकांचा कल वाढू लागला आहे.

 

पिंपरी-चिंचवड हे देशातील सर्वाधिक वेगाने वाढणारे महानगर आहे. या आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये चाकण, भोसरी आणि तळेगाव सारखी अवाढव्य औद्योगिक क्षेत्रे (MIDC), हिंजवडी, तळवडे व चिखली सारखे आयटी पार्क परिसर आहेत. तसेच देहू व आळंदी सारखी संतांची पवित्र भूमी आणि पिंपरी बाजारपेठेसारखी भव्य व्यावसायिक बाजारपेठ समाविष्ट आहे. याशिवाय शहराच्या हद्दीतून तब्बल ५ महत्त्वाचे राष्ट्रीय व राज्य महामार्ग जातात.

उदरनिर्वाहासाठी देश-विदेशातून आलेल्या लाखो लोकांमुळे दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. वाहने वाढल्याने नो पार्किंगमध्ये गाड्या लावणे, काळ्या काचा वापरणे, फटाके फोडणारे सायलेंसर वापरणे अशा वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाणही वाढले होते. यावर आळा घालण्यासाठीच ही मोहीम हाती घेण्यात आली.

वाहतूक शाखेने वेगवेगळ्या ५ गंभीर वाहतूक गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करून ही कडक मोहीम राबवली. त्याचा सविस्तर आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

नियमभंगाचा प्रकार (Head of Action) केलेल्या एकूण कारवाया
वाहतुकीस अडथळा निर्माण करणे / नो पार्किंग १०,६०७
जड व अवजड वाहनांची नियमबाह्य वाहतूक (No Entry Violations) ४,४४४
चारचाकी वाहनांना बेकायदेशीर काळी काच लावणे (Black Glass) २,५६२
फटाके फोडणारे आवाज करणारे सायलेंसर (Modified Silencer) १,०१८
मद्य प्राशन करून वाहन चालवणे (Drunk and Drive) ४०४
एकूण कारवाई १९,०३५
एकूण वसूल केलेला दंड ₹१,८५,१३,३००/-

शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडी, नियमबाह्य वाहन पार्किंग किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या वाहतूक समस्येची तक्रार थेट पोलिसांकडे करता यावी, यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने ‘ट्राफिक बडी’ व्हॉट्सॲप चॅट बॉट क्रमांक: ८७८८६४९८८५ (8788649885) सुरू केला आहे.

नागरिकांनी या क्रमांकावर आपल्या परिसरातील वाहतूक समस्यांचे फोटो, व्हिडिओ आणि माहिती पाठवून पोलिसांना सहकार्य करावे, जेणेकरून तिथल्या समस्येचे तात्काळ निवारण केले जाईल, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

वाहतूक नियंत्रण आणि कडक शिस्त आणण्याची ही धडक कामगिरी पोलीस आयुक्त मा. श्री. विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मा. डॉ. शशिकांत महावरकर आणि अपर पोलीस आयुक्त मा. श्री. सारंग आवाड यांच्या थेट आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली पार पडली.

या मोहिमेची प्रत्यक्ष अंमलबजावणी व नियोजन वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त (DCP Traffic) मा. श्री. विक्रांत देशमुख यांनी सर्व वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षकांच्या व जवानांच्या मदतीने यशस्वीपणे केले आहे.

“पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्य करणाऱ्या आणि कामानिमित्त रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या सर्व सुजाण नागरिकांनी स्वतःहून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. दंडात्मक आणि न्यायालयीन कारवाई टाळून आपली सुरक्षितता जपण्याचे काम वाहनचालकांनी करावे.”विक्रांत देशमुख (पोलीस उप आयुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड)

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!