‘मॅक्स मंथन’च्या बातमीचा इम्पॅक्ट: रावेतच्या भूखंडावरील अतिक्रमणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश!
माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्या कथित अतिक्रमणाने प्रशासन खडबडून जागे; भूमी व जिंदगी उपायुक्त सीताराम बहुरे यांनी अहवाल मागवला!
पिंपरी, दि. २ जुलै २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): ‘मॅक्स मंथन डेली न्यूज’मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. रावेत, सेक्टर क्र. २९ येथील भोंडवे कॉर्नर ते जाधववस्ती या रस्त्यावरील महावितरणच्या जागेच्या शेजारील महापालिकेच्या दोन एकर भूखंडावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी अतिक्रमण करून आलिशान कार्यालय थाटल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या वृत्ताची तात्काळ दखल घेत, भूमी आणि जिंदगी विभागाचे उपायुक्त सीताराम बहुरे यांनी ‘ब’ क्षेत्रीय अधिकाऱ्यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

नेमके प्रकरण काय?
सामाजिक कार्यकर्ते युवराज दाखले यांनी यापूर्वीच तक्रार केली होती की, महापालिकेचे सीमा कुंपण तोडून ही कोट्यवधी रुपयांची जागा बेकायदेशीरपणे वापरली जात आहे. सुरुवातीला येथे कंटेनर टाकून कार्यालय बांधले होते, मात्र आता त्याच्या शेजारी वीट बांधकाम करून एक सुसज्ज कार्यालय उभारले आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप दाखले यांनी केला होता.
याच पार्श्वभूमीवर ‘मॅक्स मंथन डेली न्यूज’ने हे वृत्त प्रकाशित करताच, महापालिका अधिकाऱ्यांनी तात्काळ रावेत येथील जागेवर धाव घेतली आणि पाहणी केली. या पाहणीत घटनास्थळी विरंगुळा केंद्र आणि एक कार्यालय असल्याचे समोर आले.
जनतेची मागणी आणि प्रशासनाचे निर्देश:
रावेत भागातील नागरिकांनी आता थेट मागणी केली आहे की, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून निवडणूक आयोगाने त्यांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंधन घालावे.
या गंभीर तक्रारीची दखल घेत, भूमी आणि जिंदगी विभागाचे उपायुक्त सीताराम बहुरे यांनी ‘ब’ क्षेत्रीय अधिकाऱ्यांना खालीलप्रमाणे निर्देश दिले आहेत:
- या जागेवर महापालिकेच्या मालकी हक्काचा बोर्ड लावावा.
- सदर ठिकाणी झालेले बांधकाम महापालिकेने केले आहे की ते अतिक्रमण झालेले आहे, याची सर्व शहानिशा करावी.
- या सर्व पाहणी आणि चौकशीनंतर सविस्तर अहवाल तात्काळ सादर करावा.
या प्रकरणाच्या चौकशीनंतर आता महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
