मूर्तीजापूरमध्ये ट्रक पलटी, महामार्गावर वाहतूक ठप्प
भरधाव वेगामुळे झाला अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही
२९ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
मूर्तीजापूर,प्रतिनिधी : विलास सावळे – मूर्तीजापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर आज दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास एका भरधाव वेगात असलेल्या आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला. पैलपाडा येथील पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला असून, ट्रक अचानक टायर फुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाला.

महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. याचा फटका अनेक वाहनचालकांना बसला, त्यांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बेफिकीर वेग आणि वाहनांच्या देखभालीकडे होणारे दुर्लक्ष हे अशा अपघातांचे प्रमुख कारण आहे. अशा निष्काळजीपणामुळे दुसऱ्या वाहनांनाही धोका निर्माण होतो, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

बचाव पथक आणि पोलिसांची मदत
अपघाताची माहिती मिळताच वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदतकार्य सुरू केले. त्याचवेळी पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला.
स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी वाहतूक विभाग आणि महामार्ग प्राधिकरणाने अशा वारंवार होणाऱ्या अपघातांवर कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
