थेरगाव रुग्णालयाला आता ‘डीएनबी’ अभ्यासक्रमाची मान्यता!
पिंपरी-चिंचवडच्या आरोग्य सेवेत ऐतिहासिक टप्पा; वैद्यकीय शिक्षणाचे नवे केंद्र होणार
३० ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य सेवेला एक नवी दिशा मिळाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयाला नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) नवी दिल्लीकडून डीएनबी (जनरल मेडिसिन) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी मान्यता मिळाली आहे. या मान्यतेमुळे २०२५ च्या प्रवेश सत्रासाठी चार जागा मंजूर झाल्या असून, हा पिंपरी-चिंचवडसाठी एक ऐतिहासिक टप्पा असल्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी म्हटले आहे.
आरोग्यसेवेला मिळणार बळकटी
यापूर्वीच थेरगाव रुग्णालयाला पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी १२ जागांची मान्यता मिळाली होती, तर आकुर्डी आणि भोसरी रुग्णालयातही असे अभ्यासक्रम सुरू आहेत. यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातही पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू आहेत. आता थेरगाव रुग्णालयातही पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू झाल्याने महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला अधिक बळकटी मिळणार आहे.
या नव्या मान्यतेमुळे थेरगाव रुग्णालयाचे शैक्षणिक आणि वैद्यकीय स्वरूप अधिक सक्षम होईल. येथे दररोज येणाऱ्या मोठ्या संख्येतील रुग्णांमुळे विद्यार्थ्यांना विविध आजारांवरील उपचारांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. यासोबतच, आधुनिक सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळाल्याने त्यांच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळेल.

दर्जेदार डॉक्टर घडवण्याचे केंद्र
महापालिकेची रुग्णालये केवळ आरोग्यसेवा पुरवण्यापुरती मर्यादित न राहता आता वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षणाचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होत आहेत. आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, “उच्च दर्जाची आरोग्यसेवा, आधुनिक सुविधा आणि कुशल मनुष्यबळ तयार करण्यासोबतच शैक्षणिक व संशोधनाच्या संधी निर्माण करणे हे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. यामुळे भविष्यात कुशल डॉक्टर्स तयार होतील आणि नागरिकांना उच्च गुणवत्तेची आरोग्यसेवा मिळेल.”
थेरगाव रुग्णालयाला मिळालेली ही मान्यता म्हणजे अनेक वर्षांच्या अथक परिश्रमाचे फळ आहे, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी म्हटले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण मिळेल आणि रुग्णसेवा अधिक सक्षम होईल.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
