ऐतिहासिक थांबा! मुंबई-हावडा दुरंतो एक्सप्रेस आता अकोल्यात थांबणार
खासदार अनुप धोत्रे यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांना मोठा दिलासा
०१ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
अकोला – प्रतिनिधी : विलास सावळे अकोला शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरला, कारण मुंबई-हावडा दुरंतो एक्सप्रेस (१२२६१) गाडीने १ सप्टेंबर रोजी पहाटे १२:४० वाजता अकोला रेल्वे स्थानकावर ऐतिहासिक थांबा घेतला. या विशेष क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. गाडी प्लॅटफॉर्मवर दाखल होताच ‘भारत माता की जय’, ‘जय श्रीराम’ आणि ‘अनुपभाऊ धोत्रे आगे बढो’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
गौरवशाली स्वागत सोहळा
या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी अकोला महानगरतर्फे स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते रेल्वे चालक आलो कुमार आणि त्यांचे सहकारी संजय बॅनर्जी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार वसंत खंडेलवाल, आमदार रणधीर सावरकर, रेल्वे सल्लागार समिती सदस्य वसंत बाचोका, अॅड. अमोल इंगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच, खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर आणि आमदार वसंत खंडेलवाल यांच्या हस्ते गाडीला हिरवी झेंडी दाखवून पुढे रवाना करण्यात आले.

सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित
गेल्या अनेक दिवसांपासून या गाडीला अकोल्यात थांबा मिळावा यासाठी खासदार अनुप धोत्रे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, रेल्वे मंत्रालयाने या अधिकृत थांब्याला मंजुरी दिली आहे. यामुळे अकोल्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, शहराच्या विकासासाठी हे एक सकारात्मक आणि महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. भाजप महानगराध्यक्ष जयंत मसने, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
