शेतकरी संघटनेच्या राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्षपदी डॉ. भारती चव्हाण यांची निवड
शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळवून देणाऱ्या संस्थेची तिहेरी जबाबदारी; महा ऍग्रो फेडरेशनच्या कार्यकारी अध्यक्षपदीही नियुक्ती
पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे, ११ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
शेतकरी आणि महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या मानिनी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांची शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार संघटना महासंघच्या ‘राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्षपदी’ तसेच ‘राष्ट्रीय कार्यकारणी समिती सदस्य’पदी निवड करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, त्यांना ‘महा ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी फेडरेशनच्या कार्यकारी अध्यक्ष’ पदाचीही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निवडीची घोषणा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार आणि राष्ट्रीय सचिव यू. आ. सिद्दिकी यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे ध्येय
या दोन्ही संस्था देशातील व राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य आर्थिक मोबदला मिळवून देण्यासाठी कार्यरत आहेत. शेतकऱ्यांचे संघटन करून त्यांच्या समस्या सोडवण्यात त्या पुढाकार घेतात. तसेच, उत्पादन, प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन आणि विपणन या बाबतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम करतात.
उत्तम संघटन कौशल्य आणि उच्च शिक्षणाचा अनुभव असलेल्या डॉ. भारती चव्हाण या त्यांच्या नव्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास विठ्ठल राजे पवार यांनी व्यक्त केला.
नव्या ऊर्जेने काम करणार
या तिहेरी जबाबदारीवर बोलताना डॉ. भारती चव्हाण म्हणाल्या, “मी नव्या ऊर्जेने आणि नियोजनबद्धतेने सर्वांना सोबत घेऊन संघटनेच्या कार्यासाठी काम करेन.” त्यांच्या या निवडीमुळे शेतकरी वर्गाला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
