पवना धरणाचे जलपूजन; १०० टक्के भरल्याने पत्रकारांनी जपली परंपरा
लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत गेली चार वर्षांपासून पत्रकारांकडून आयोजन
पिंपरी-चिंचवड, पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे १३ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पवना धरण १०० टक्के भरल्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवणाऱ्या पवनामाईचे आज जलपूजन करण्यात आले. अखिल मराठी पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गोरे यांच्या हस्ते हे जलपूजन करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेवर लोकप्रतिनिधी नसल्याने ही परंपरा खंडित होऊ नये म्हणून पत्रकारांनी गेली चार वर्षे जलपूजनाचे आयोजन सुरू ठेवले आहे.

जलपूजनाचा उद्देश आणि महत्त्व
पवना धरण भरल्यानंतर जलपूजन करण्याची ही परंपरा गेली तीन वर्षांपासून पत्रकार जपत आहेत. ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गोरे यांनी सांगितले की, पवनामाई वर्षभर पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवते, त्यामुळे तिचे आभार मानण्यासाठी आणि तिचा आदर राखण्यासाठी हे जलपूजन केले जाते. पवनामाईची पूजा पुष्पहार आणि श्रीफळ वाहून करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ, सुनील उर्फ बाबू कांबळे, प्रवीण शिर्के, विनय लोंढे, संतलाल यादव, सूरज साळवे, देवा भालके, जितेंद्र गवळी, दिलीप देहाडे, संतोष जराड आणि गणेश शिंदे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते. जलपूजनानंतर पत्रकारांनी जलविहाराचाही आनंद घेतला.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
