साई पंचशीनगर (बौद्ध विहार ) दलित वस्ती अंधारात; नागरिकांचा जनआंदोलनाचा इशारा
दोन वर्षांपासून हाय मास्ट लाईट बंद; ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षावर स्थानिक रहिवाशांचा संताप
मावळ, प्रतिनिधी अजय यादव, १३ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील साई पंचशीलनगर (बौद्ध विहार) येथील दलित वस्ती गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून अंधारात आहे. सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च करून बसवलेली हाय मास्ट लाईट बंद असल्यामुळे येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास येत्या काळात जनआंदोलन सुरू करण्याचा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.
जंगली प्राण्यांची भीती
डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या या गावात जंगली प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. बिबट्या, साप यांसारखे प्राणी अंधाराचा फायदा घेऊन मानवी वस्तीत शिरतात, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी ग्रामस्थांनी गेल्या वर्षभरापासून ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज देऊन नवीन दिवे लावण्याची मागणी केली आहे, मात्र कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
गणेशोत्सवातही टाळाटाळ
नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवासाठी ग्रामपंचायतीने पूर्ण गावात बल्ब बसवले. यावेळी कर्मचाऱ्यांकडे बल्बची मागणी केली असता, “बल्ब संपले आहेत” असे उत्तर देत टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या वस्तीसाठी गेल्या तीन ते चार वर्षांत एक रुपयाचा निधीही वापरला गेला नाही, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. फक्त एक सौरऊर्जेचा दिवा लावून ग्रामस्थांची बोळवण करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
या गंभीर परिस्थितीत सर्पमित्र विकास गरवड, निखिल यादव, करुणा यादव, हिराबाई वंजारी आणि सुमन यादव यांनी आपल्या भावना व्यक्त करत प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. येत्या काळात ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीने लक्ष न दिल्यास जनआंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
