news
Home पिंपरी चिंचवड वाकडमध्ये महापालिकेचा दुस-या दिवशीही धडाका! ४३ अनधिकृत पत्राशेडवर चालला हातोडा

वाकडमध्ये महापालिकेचा दुस-या दिवशीही धडाका! ४३ अनधिकृत पत्राशेडवर चालला हातोडा

जगताप डेअरी ते भुजबळ चौक परिसर अतिक्रमणमुक्त; १६ जेसीबी आणि ३०० हून अधिक सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात कारवाई | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्र. २५ व २६ मधील अनधिकृत पत्राशेडवर महापालिकेची निष्कासनाची कारवाई

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , ३० एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्र. २६ मधील जगताप डेअरी ते कस्पटे वस्ती आणि प्रभाग क्र. २५ मधील वाकड चौक ते भुजबळ चौक या परिसरातील अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाने आज पुन्हा एकदा धडक कारवाई केली. आज सकाळी १० वाजल्यापासून राबविण्यात आलेल्या या व्यापक मोहिमेत एकूण ४३ अनधिकृत पत्रा शेड जमीनदोस्त करण्यात आले.

  • निष्कासित बांधकामे: प्रभाग क्र. २६ मधील जगताप डेअरी ते कस्पटे वस्ती दरम्यानची २७ आणि प्रभाग क्र. २५ मधील वाकड चौक ते भुजबळ चौक दरम्यानची १६ अशी एकूण ४३ पत्रा शेड निष्कासित करण्यात आली.

  • एकूण क्षेत्रफळ: या कारवाईत सुमारे ६३ हजार १८४ चौ. फूट अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले आहे.

  • पूर्वसूचना: संबंधित अनधिकृत पत्राशेड धारकांना महापालिकेने आधीच नोटिसा बजावल्या होत्या, त्यातील मुदत संपल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

ही कारवाई आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत खालील यंत्रणांचा समावेश होता:

  • अधिकारी व कर्मचारी: महापालिकेचे १५० अधिकारी व कर्मचारी, २४ पोलीस अधिकारी, ९० पोलीस कर्मचारी आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे १२० जवान.

  • मजूर व यंत्रसामग्री: १६ जेसीबी, २ ट्रॅक्टर ट्रॉली आणि ६० मजूर.

  • सुरक्षा व्यवस्था: आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशमन दलाची एक गाडी आणि दोन ॲम्बुलन्स घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

या मोहिमेत सह शहर अभियंता सुनील भागवानी, उप आयुक्त अतुल पाटील, क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घारगे, राजाराम सरगर, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत कोल्हे यांच्यासह विविध विभागाचे अभियंते व अधिकारी प्रत्यक्ष सहभागी झाले होते.

शहरातील अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवून नागरिकांना सुरक्षित आणि नियोजनबद्ध नागरी सुविधा उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. नियमबाह्य बांधकामे कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाहीत, असा स्पष्ट संदेश महापालिका प्रशासनाने दिला आहे.

“शहरातील अनधिकृत बांधकामांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांना सुरक्षित सुविधा देणे ही आमची प्राथमिकता आहे. नियमबाह्य बांधकामांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत सुरू असलेली ही कारवाई पुढील काही दिवस सातत्याने सुरू राहणार आहे.”

— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!