महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ३० एप्रिल २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जीवन म्हणजे सेवा, साधेपणा आणि समाजजागृती यांचा आदर्श आहे. त्यांनी दिलेला स्वच्छता, श्रमसंस्कार आणि एकात्मतेचा संदेश आजच्या काळातही अत्यंत महत्त्वाचा ठरतो,” असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर लांडगे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे महाराष्ट्रातील एक थोर संत, समाजसुधारक आणि राष्ट्रभक्त होते. त्यांनी कीर्तन आणि भजनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन केले. विशेषतः त्यांनी लिहिलेल्या ‘ग्रामगीता’ या ग्रंथातून आदर्श ग्रामविकास, स्वच्छता, श्रमसंस्कार आणि नैतिक जीवनाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीतही सक्रिय सहभाग नोंदवत जनमानसात देशभक्तीची भावना रुजवली. त्यांच्या या अफाट कार्यामुळेच त्यांना ‘राष्ट्रसंत’ ही उपाधी देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी उपआयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कार्यकारी अभियंता सुनीलदत्त नरोटे, सुनील पवार, सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने आणि कामगार नेते नागेश जाधव आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
