news
Home मुख्यपृष्ठ बँकांनो, शेतकऱ्याला मदत करा, त्याला वाऱ्यावर सोडू नका!

बँकांनो, शेतकऱ्याला मदत करा, त्याला वाऱ्यावर सोडू नका!

सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांचा बँकांना थेट इशारा; ‘बँकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी’. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

शेतकऱ्यांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; नव्याने पिककर्ज द्या: प्रणिती शिंदे यांची मागणी

 

 

सोलापूर जिल्हास्तरीय आढावा समितीच्या बैठकीत खासदार शिंदे यांचे बँकांना निवेदन

 

सोलापूर, प्रतिनिधी जयकुमार चर्जन, १९ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शेतकरी आणि नागरिकांच्या बँकसंबंधी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी आज जिल्हास्तरीय आढावा समितीच्या (DLRC) बैठकीत जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बँकांना शेतकऱ्यांना सक्तीने वसुली न करता मदत करण्याचे आवाहन केले. पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट, मंगळवेढा, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी व नागरीकांच्या समस्या अधोरेखित करून त्यांनी बँक अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

 


शिंदे यांच्या प्रमुख मागण्या

निवेदनात खासदार शिंदे यांनी बँक अधिकाऱ्यांपुढे खालील प्रमुख मागण्या मांडल्या:

  • पिककर्जाचे वाटप: शेतकऱ्यांचा ‘सिबिल स्कोअर’ न पाहता त्यांना मागणीनुसार पिककर्ज उपलब्ध करून द्यावे आणि ५ एकर जमिनीची सक्तीची अट रद्द करावी.
  • सक्तीची वसुली थांबवा: अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली तात्काळ थांबवावी. या सक्तीच्या वसुलीमुळे शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.
  • नवीन कर्जवाटप: रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना नवे कर्जवाटप करून पेरणीसाठी सक्षम करावे.
  • कर्ज आणि सबसिडी: शेतकऱ्यांना विहिरी व सौर मोटारींसाठी कर्ज आणि सबसिडी द्यावी.
  • शैक्षणिक कर्ज: शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना शैक्षणिक कर्ज आणि शिष्यवृत्ती मिळण्यासाठी सहकार्य करावे.
  • वन टाइम सेटलमेंट (OTS) केलेल्यांना मदत: ज्या शेतकऱ्यांनी ‘वन टाइम सेटलमेंट’ केली आहे, त्यांना पुन्हा कर्जवाटपात सहकार्य करावे.

बँकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी

खासदार शिंदे यांनी स्पष्ट केले की, सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले असून अनेक गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जर बँकांनी सकारात्मक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना वेळेवर मदत केली नाही, तर त्यांचे आर्थिक संकट आणखी वाढेल. त्यामुळे बँकांनी तातडीने योग्य पाऊले उचलून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!