विद्यार्थ्यांनी करिअरचे ध्येय विद्यार्थीदशेतच निश्चित करावे – डॉ. पराग काळकर
‘यशस्वी एज्युकेशन सोसायटी’च्या ‘यशोप्रवेश’ कार्यक्रमात यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन
पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे २१ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरचे ध्येय विद्यार्थीदशेतच निश्चित करून ते पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी केले. चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स’ (IIMS) आणि ‘इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रिसर्च’ (IBMR) च्या ‘यशोप्रवेश’ कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
यशासाठी आवश्यक गोष्टी
डॉ. काळकर म्हणाले की, एमबीए आणि एमसीएच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाच्या पहिल्या दिवसापासूनच आपल्या करिअरचा आराखडा तयार करावा. कोणत्या कंपनीत, कोणत्या पदावर आणि किती पगाराची नोकरी हवी, याचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे.
ते पुढे म्हणाले, “वेळेचे व्यवस्थापन, कामाप्रती निष्ठा आणि वर्तणुकीत योग्य बदल करून ध्येयप्राप्तीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे. केवळ परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यास न करता, शिकलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात कसा वापर करता येईल, याचा विचार करा.”
कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रात डॉ. मीनल राव, वरिष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापिका थरमॅक्स कंपनी, मनोजकुमार चौधरी, सॅप डिलिव्हरी मॅनेजर व आयबीएम प्रशिक्षक डॉ. हॅरोल्ड डिकॉस्टा,अध्यक्ष सायबर सिक्युरिटी कोऑपरेशन. ऍड. सीमा शर्मा,पॉश कायदेतज्ज्ञ, प्राची सोनचल, प्रमुख मनुष्यबळ व्यवस्थापिका बर्कहार्ट कॉम्प्रेशन होल्डिंग. एनएलपी प्रशिक्षक अनुपमा मिश्रा यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तर समारोप सत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शंतनूराव किर्लोस्कर अध्यासनाचे प्रा. डॉ. कॅप्टन सी. एम. चितळे यांनी त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातील विविध उदाहरणे सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
स्वतःशी स्पर्धा करा, इतरांशी नाही
बायोरॅड मेडीसीस कंपनीचे मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापन अधिकारी डॉ. उज्ज्वल भट्टाचार्जी यांनी विद्यार्थ्यांना इतरांशी तुलना न करता केवळ स्वतःशीच स्पर्धा करण्याचा सल्ला दिला. त्यांनी समर्पण आणि आत्मविश्वास अंगीकारून यशाच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले.
संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी सध्याच्या युवा पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपले व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले.
या कार्यक्रमात अनेक तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना करिअर आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे आणि डॉ. बाळासाहेब शिवळे यांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नताशा दलाल, कोमल गौड,रिया मिरजकर, सेजल गायकवाड या विद्यार्थिनींनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. वंदना मोहंती यांनी केले.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


