अकोट शहरात देहव्यापाराचा अड्डा उद्ध्वस्त; अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत मोठी कारवाई
पोलिसांच्या छाप्यात सहा महिलांना घेतले ताब्यात; १.४४ लाखांचा मुद्देमाल जप्त
अकोला, प्रतिनिधी : विलास सावळे, २३ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
अकोला जिल्ह्यातील अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने आज अकोट शहरात मोठी कारवाई करून देहव्यापाराचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेसह एक ग्राहक आणि पाच पीडित महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी छापा टाकून सुमारे १ लाख ४४ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिनाबाई पागृत चालवत होती अड्डा
अकोट शहरातील मच्छी मार्केट परिसरात मिनाबाई विजय पागृत (वय ६५) ही महिला नजुलच्या जागेवर ताडपत्रीच्या छोट्या खोल्या उभारून देहव्यापाराचा व्यवसाय चालवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. ही महिला बाहेरून महिलांना आणून ग्राहकांना पुरवत असल्याची खात्री झाल्यावर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.
या छाप्यात आरोपी मिनाबाई पागृत, ग्राहक शिवा सदाशिव गौतम (रा. बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश), आणि पाच पीडित महिलांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख ४४ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपींवर कठोर गुन्हा दाखल
आरोपी मिनाबाई पागृत आणि शिवा गौतम यांनी संगनमत करून अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याचे पोलिसांच्या तपासात आढळले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कलम ३, ४, ५ अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अकोट शहर पोलीस करत आहेत.
सदर ची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री अचिंत चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेडी, उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट उपविभाग श्री सचिन पाटील, पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थागुशा यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला. या कारवाईत सपोनि कविता फुसे, सपोउपनि सुरज मंगरूळकर, पोहेका प्रदीप उंबरकर, पोहकॉ दिनेश शिरसाट, पोहेकॉ विशाल मोरे, मपोहकों वैशाली रणवीर, मपोहकों पुनम पातोंड, मपोहेकों शिल्पा मगर, चालक भागवत काळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील सुलतान पठाण, सतीश पवार प्रशांत कमलाकार व दोन पंच सहभागी झाले होते.. ही कारवाई पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला अनैतिक मानवी वाहतूक कक्ष यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास अकोट शहर पोलिसांकडून सुरू आहे.
या कारवाईने शहरातील सामाजिक सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी नागरिकांनाही अशा बेकायदेशीर कृत्यांबद्दल माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
