पिंपरी महापालिकेत ‘कर आकारणी’वरून वादंग; चुकीच्या फाइलवर सह्या करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव
निवडणुकीपूर्वी बिले काढण्यासाठी ठेकेदारांची घाई; अधिकाऱ्यांनी वाढीव खर्चाला दिली मंजुरी
पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे, २५ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करणाऱ्या ठेकेदारावर गंभीर आरोप केले जात आहेत. निवडणुकीपूर्वी आपले काम संपवून महापालिकेकडून बिले उकळण्याच्या घाईत असलेल्या या ठेकेदाराने केलेल्या चुकीच्या कर आकारणीच्या फाइलवर सह्या करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
कोट्यवधींचे बिल काढण्यासाठी ‘फाइलवर सह्या करा’चा दबाव
महापालिकेच्या स्थापत्य कन्सल्टंट ठेकेदाराने केलेल्या सर्वेक्षणात शहरात ३ लाख ७० हजार २१३ मिळकती कर आकारणीच्या बाहेर असल्याचे आढळून आले होते. मात्र, ठेकेदाराकडून ही कर आकारणी करताना हजारो मिळकतींना नियमबाह्य आणि चुकीच्या पद्धतीने नंबरिंग देण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच, महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांची बिले काढण्यासाठी अनधिकृत मालमत्तांचे तुकडे करून स्वतंत्र नोंदी केल्याचाही आरोप होत आहे.
कर आकारणीसाठी आलेल्या सुमारे सहा हजार ‘एसआर वन’ फाइल सध्या गट प्रमुखांकडे धूळ खात पडल्या आहेत. या फाइलवर सह्या करण्यास कर्मचारी टाळाटाळ करत आहेत. चुकीच्या फाइलवर सह्या केल्यास भविष्यात ऑडिटमध्ये जबाबदार कोण राहणार, असा प्रश्न कर्मचारी उपस्थित करत आहेत.
अतिरिक्त आयुक्तांनी दिला इशारा?
या प्रकरणी महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांवर सह्या करण्यासाठी दबाव आणत आहेत. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी कर्मचाऱ्यांना ‘फाइलवर सह्या करून पुढे पाठवा, अन्यथा कारवाई करू,’ असा धमकीवजा इशारा दिल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.
याविषयी बोलताना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले की, “अनेक मालमत्ता कराच्या कक्षेत आल्या आहेत. त्यांना तातडीने कर आकारणी करण्यासाठी फाइल पुढे पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत, जेणेकरून महापालिकेच्या तिजोरीत भर पडेल.”
ठेकेदाराला ४८ कोटी रुपयांचे काम असताना, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ड्रोन सर्वेक्षणाच्या नावाखाली २९ कोटी रुपयांची वाढीव रक्कम मंजूर केल्याचा आरोपही होत आहे. त्यामुळे एकूण ७७ कोटी रुपयांचे बिल काढण्यासाठी ही घाई सुरू असल्याची चर्चा आहे.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
