बार्शीच्या राजकारणात मोठा भूकंप! ऍड. सुप्रिया गुंड-पाटील यांचा राष्ट्रवादीला रामराम
राष्ट्रवादीच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा देताच नगराध्यक्ष पदासाठी रेस तापली; राजेंद्र राऊत गटातून उमेदवारी मिळण्याची चर्चा जोरात.
सोलापूर, प्रतिनिधी :- पंडित गवळी, दि. ऑक्टोबर (पंडीत गवळी), मॅक्स मंथन डेली न्यूज:
बार्शीच्या राजकीय पटावर आज (दि. ऑक्टोबर) मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि धाराशिव जिल्हा निरीक्षकपदासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या ऍडव्होकेट सुप्रिया गुंड-पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. नगरपरिषदेच्या निवडणुका अगदी तोंडावर असताना घेतलेल्या त्यांच्या या निर्णयामुळे बार्शीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाच्या कामात सचोटीने कार्यरत असलेल्या ऍड. सुप्रिया गुंड-पाटील यांनी आपले संघटन कौशल्य, सखोल अभ्यास आणि सातत्यपूर्ण जनसंपर्काच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपले स्थान निर्माण केले होते. मात्र, पक्ष सोडल्यामुळे बार्शीतील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या राजकीय समीकरणांची चाहूल लागली आहे.
नगराध्यक्ष पदासाठीची रेस तापली!
बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण जाहीर झाल्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. उज्वला सोपल, निर्मला बारबोले, वर्षाताई ठोंबरे यांच्यासह अनेक महिलांची नावे चर्चेत असतानाच, ऍड. सुप्रिया गुंड-पाटील यांचे नाव आता अग्रक्रमावर आले आहे.
माजी आमदार राजेंद्र राऊत गटाची साथ:
च्या लोकसभा निवडणुकीपासून ऍड. गुंड-पाटील यांची माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाशी जवळीक वाढली होती. विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांनी राऊत गटाच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे आता येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत राऊत गटाकडून त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळणार का, यावर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
“राऊत गटातून संधी मिळाल्यास नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविण्यास तयार आहे.” — ऍड. सुप्रिया गुंड-पाटील (राजीनाम्यानंतर संपर्क साधल्यावर मांडलेली भूमिका)
ऍड. गुंड-पाटील यांच्या या थेट भूमिकेने त्यांनी आपले राजकीय लक्ष्य स्पष्ट केले आहे. अभ्यासू, संपर्कसंपन्न आणि जनतेशी थेट नातं राखणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मोठा धक्का मानला जात आहे, तर दुसरीकडे राऊत गटासाठी ही एक मजबूत भर ठरण्याची शक्यता आहे. बार्शीतील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून, गुंड-पाटील यांच्या या निर्णयाने आगामी निवडणुकीचा रंग पालटण्याची चिन्हे आहेत!
© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
