पिंपरी-चिंचवड महापालिका सलग पाचव्यांदा राज्यात अव्वल!
राज्यस्तरीय आरोग्य कार्यक्रमांच्या रँकिंगमध्ये २७ महापालिकांना मागे टाकले; वैद्यकीय विभागाचे वर्चस्व कायम
पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले, दिनांक ११/१०/२०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आरोग्य सेवांच्या कार्यप्रदर्शनात पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयामार्फत नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या जुलै व ऑगस्ट २०२५ च्या आरोग्य कार्यक्रमांच्या रँकिंग () मध्ये पिंपरी चिंचवड महापालिका सलग पाचव्यांदा राज्यात प्रथम स्थानी राहिली आहे. राज्यातील एकूण २७ महानगरपालिकांना मागे टाकत पिंपरी चिंचवड महापालिकेने ही उत्कृष्ट कामगिरी साधली. जुलै महिन्यात ४४.८५ गुणांसह, तर ऑगस्ट महिन्यात ४३ गुण मिळवून महापालिकेने आपले प्रथम स्थान कायम राखले आहे.
उत्कृष्ट कामगिरीचे निकष
महापालिकेने मातृत्व आरोग्य, बाल आरोग्य, लसीकरण, कुटुंब नियोजन, किशोरवयीन आरोग्य, क्षयरोग नियंत्रण, डेंग्यू व मलेरिया नियंत्रण, असंसर्गजन्य आजार नियंत्रण, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, पोर्टल, , आयुष्मान भारत-आरोग्य कल्याण केंद्रे तसेच प्रशासन व वित्तीय व्यवस्थापन अशा अनेक महत्त्वाच्या निर्देशकांवर उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या या यशातून हे स्पष्ट झाले आहे की, सुयोग्य नियोजन, प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यामुळेच आरोग्यसेवेत उत्तम कामगिरी साधता येते.
अधिकारी वर्गाच्या प्रतिक्रिया
अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी या कामगिरीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “ही रँकिंग केवळ आकडेवारी नाही, तर आपल्या कार्यसंस्कृतीची आणि आरोग्य सेवेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची पावती आहे. नागरिकाभिमुख धोरणे, सातत्यपूर्ण तपासणी आणि रोगांवर नियंत्रण यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.”
आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी या यशाचे श्रेय कर्मचाऱ्यांना दिले. ते म्हणाले, “वैद्यकीय विभागाने गेल्या काळात तब्बल पाच वेळा राज्यस्तरावर पहिला क्रमांक पटकावला आहे. आरोग्य सेवा पोहोचवताना प्रत्येक स्तरावर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांपासून रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत सर्वांचा सहभाग महत्त्वाचा ठरला आहे. आगामी काळात आणखी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आम्ही ही कामगिरी टिकवून ठेवू, असा आम्हाला विश्वास आहे.”
© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
