माढा तालुक्यातील पूरग्रस्तांना ‘डब्ल्यू.एम.ओ.’ संस्थेकडून माणुसकीचा आधार!
सुलतानपूर, वडशिंगे, निमगाव येथे २०० हून अधिक किराणा किट, साड्या आणि शालेय साहित्याचे वाटप; ‘संकटात माणुसकी जपण्याचे’ आवाहन
माढा/सोलापूर, प्रतिनिधी :- पंडित गवळी, दिनांक ११/१०/२०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
माढा तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबांना ‘डब्ल्यू.एम.ओ.’ () संस्थेकडून मोठ्या प्रमाणात मदतीचा हात देण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झालेल्या सुलतानपूर, निमगाव आणि वडशिंगे या गावांमध्ये संस्थेने जीवनावश्यक वस्तूंचे आणि दैनंदिन गरजांचे वाटप करून माणुसकीची सेवा केली आहे.
या मदत उपक्रमात हून अधिक किराणा किट, २०० हून अधिक साड्या, लहान मुलांसाठी शालेय साहित्य व कपडे, पुरुषांसाठी शर्ट-पॅन्ट, तसेच एक वर्षाखालील बालकांसाठी पाळणे व गाद्या यांचे वाटप करण्यात आले.
संस्थेच्या सदस्यांनी व्यक्त केल्या भावना
या मदतकार्यात सहभागी झालेल्या सलोनी नरवडे यांनी संस्थेची भावना व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “पूरग्रस्त नागरिकांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ही मदत थोडासा आधार ठरावी, ही आमची मनापासून इच्छा आहे. समाजातील प्रत्येकाने अशा वेळी पुढाकार घेऊन माणुसकी जपावी.”
रवी जाधव यांनी आपले समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “पूरग्रस्त भागातील लोकांनी मोठ्या संकटाचा सामना केला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर थोडं हसू आणता आलं, हीच आमच्यासाठी मोठी समाधानाची बाब आहे. संस्थेचे कार्य हे केवळ मदत नाही, तर माणुसकीची सेवा आहे.”

मदतकार्यात यांचा होता सहभाग
यावेळी सलोनी नरवडे, अनिकेत जरे, रवी जाधव, सुभाष पालेकर, चेतन गोळे, विजय साळेकर तसेच स्थानिक ग्रामस्थ, माजी सरपंच अनिल शिंदे, गोरक्ष शिंदे, प्रशांत जाधव आदी उपस्थित होते. संस्थेच्या या वेळेवर आणि भरीव मदतीमुळे पूरग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
