पिंपरी-चिंचवड पोलिसांची ‘गुंडगिरी’ला साथ! सत्ताधारी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याला पोलीस ठाण्यातच मारहाण
भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव तेजस्विनी कदम यांच्यावर प्राणघातक हल्ला; प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्याने संताप
पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २८ ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड शहरात लोकप्रतिनिधींपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कोणीच सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) युवा मोर्चाच्या एका प्रदेश महिला पदाधिकाऱ्याला शहरातील एका पोलीस ठाण्यातच मारहाण झाल्याचा आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या पक्षाच्याच बड्या नेत्याला पोलिसांनी ‘संरक्षण’ दिल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे.
भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव तेजस्विनी कदम यांच्यावर भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी पाळलेल्या पुरुष व महिला गुंडांनी प्राणघातक हल्ला केला. तेजस्विनी कदम या पिंपरी-चिंचवड भाजप युवती आघाडीच्या माजी शहराध्यक्षा आहेत. सोमवारी अनुप मोरे यांच्या गुंडांनी प्रथम तेजस्विनी कदम यांच्या निगडी प्राधिकरण येथील घरावर हल्ला चढवला.
घरावर चाल करून आलेल्या गुंडांनी तेजस्विनी कदम यांना अत्यंत हीन भाषेत धमक्या दिल्या. “तू एकटी राहतेस, अनुप मोरेने तुला मारून टाकायला सांगितले आहे. तुला अपघातात गाडीने उडवू, आमचे आमच्या दादावर खूप प्रेम आहे. तुला बदनाम करू, तुझं जगणं मुश्किल करून टाकू, अनुप मोरे हा आमचा बाप आहे. तो आम्हाला सांभाळून घेईल,” अशा शब्दांत त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यातून वाचण्यासाठी तेजस्विनी कदम यांनी आपल्या कारमधून (एमएच १४ एलजी ९९६९) बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता, गुंडांनी कारची मागील काच फोडून दहशत माजवली.
या जीवघेण्या हल्ल्यानंतर, कसाबसा जीव वाचवून तेजस्विनी कदम यांनी चिंचवड पोलीस ठाणे गाठले. मात्र, अनुप मोरे यांच्या गुंडांनी त्यांचा पाठलाग करत थेट पोलीस ठाण्यात प्रवेश केला. विशेष म्हणजे, पोलीस ठाण्याच्या आतमध्ये, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समक्षच त्यांनी तेजस्विनी कदम यांना मारहाण केली. सत्ताधारी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याला पोलीस ठाण्यात मारहाण करण्याची गुंडांची हिंमत, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि कायद्याच्या धाकावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते.
या सर्व प्रकारानंतर तेजस्विनी कदम यांनी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यासह त्यांच्या गुंडांविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर तब्बल आठ ते नऊ तास उलटून गेले तरी, पोलिसांनी मुख्य आरोपी असलेले सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी अनुप मोरे यांच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल केला नाही. केवळ दोन महिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल करून, पोलिसांनी अनुप मोरे यांना ‘राजाश्रय’ दिल्याचा आरोप होत आहे.
सत्ताधारी पक्षाचे मोठे नेते आणि पदाधिकारी ‘कायद्यापेक्षा मोठे’ असल्याचा संदेश या कारवाईतून गेला आहे. “हा देश माझा आहे, हा कायदा माझा आहे,” असे म्हणत तेजस्विनी कदम चिंचवड पोलीस ठाण्यात पोलिसांना जाब विचारतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील ‘जंगलराज’ला पोलिसांची निष्क्रियता खतपाणी घालत असल्याचे चित्र आहे. जर सत्ताधारी पक्षाची महिला पदाधिकारीच पोलीस ठाण्यात सुरक्षित नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी कोणाकडे मदतीसाठी पाहावे? अनुप मोरे यांच्यावर कारवाई कधी होणार? आणि तेजस्विनी कदम यांना न्याय कधी मिळणार? याकडे आता पिंपरी-चिंचवडमधील सुजाण नागरिकांचे लक्ष लागले आहे.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
