भक्ती, आरोग्य अन् पर्यावरणाचा त्रिवेणी संगम! इंडो अथलेटिक्स सोसायटीची १० वी ‘पुणे–पंढरपूर सायकल वारी’ २,३५० सायकलस्वारांच्या विक्रमी सहभागाने संपन्न
पिंपरी चिंचवड/पंढरपूर प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, २३ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “विठ्ठल विठ्ठल”च्या चैतन्यमय गजरात, भक्ती आणि आरोग्याचा अनोखा मिलाफ घडवून आणत ‘इंडो अथलेटिक्स सोसायटी’तर्फे आयोजित करण्यात आलेली ऐतिहासिक १० वी पुणे–पंढरपूर सायकल वारी शनिवारी (दि. २० जून २०२६) अत्यंत उत्साहात संपन्न झाली. देहू येथील पवित्र गाथा मंदिरातून पहाटे अत्यंत भारावलेल्या वातावरणात निघालेल्या या वारीमध्ये देशभरातून आलेल्या तब्बल २,३५० सायकलस्वारांनी सक्रिय सहभाग नोंदवला. एकाच दिवसात २३५ किलोमीटरचे अथांग अंतर पार करत या सायकलस्वारांनी पंढरीत विठूरायाचे दर्शन घेतले. २,३५० च्या विक्रमी सहभागामुळे या वारीला ‘भारतातील सर्वात मोठी सायकल वारी’ म्हणून बहुमान मिळाला आहे. यंदाचे वर्ष या उपक्रमाचे दशकपूर्ती (१० वे) पर्व असल्याने सायकलस्वारांचा आणि आयोजकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
या ऐतिहासिक १० व्या सायकल वारीचे आणि सायकलस्वारांचे मनोबल वाढवण्यासाठी समाजातील विविध क्षेत्रांतील नामांकित व्यक्तिमत्त्वे उपस्थित होती. यामध्ये प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड मनपाचे बापूसाहेब गायकवाड, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी प्रकाश शेटबाळे, प्रसिद्ध उद्योजक अन्नारे बिरादार, तात्यासाहेब शेवाळे, वैद्यनाथ हॉस्पिटल संभाजीनगरचे डॉ. संदीप सानप व अनिल सानप, तसेच महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक श्रीराम पानझाडे उपस्थित होते. यासोबतच इंडो अथलेटिक्स सोसायटीचे (IAS) गजानन खैरे, अजित पाटील आणि गणेश भुजबळ यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी उपस्थित राहून सायकलवीरांचे स्वागत केले.
भारतात सायकलिंगची आवड निर्माण व्हावी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश घराघरांत पोहोचावा, या हेतूने २०१६ मध्ये इंडो अथलेटिक्स सोसायटीने अवघ्या ७ सायकलस्वारांसह या वारीची सुरुवात केली होती. या ऐतिहासिक प्रवासाबाबत माहिती देताना संस्थेचे संस्थापक सदस्य गजानन खैरे, अजित पाटील व गणेश भुजबळ यांनी सांगितले:
“२०१६ मधील ७ सायकलस्वारांची ही वारी आज २,३५० वर पोहोचली आहे, हा प्रवास थक्क करणारा आहे. २०१७ मध्ये २४, २०१८ मध्ये १६०, २०१९ मध्ये ५०० सहभागी झाले. कोविडसारख्या कठीण काळातही २०२१ मध्ये १७५ जणांनी हा मार्ग पूर्ण करून वारीचे सातत्य राखले. त्यानंतर २०२२ मध्ये १,२००, २०२३ मध्ये १,५००, २०२४ मध्ये १,७५० आणि २०२५ मध्ये १,९५० सायकलस्वार सहभागी झाले होते. यंदा मात्र सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले असून, ३०० महिला आणि १०० पेक्षा जास्त लहान मुलांनी २३५ किलोमीटरचा खडतर प्रवास लिलया पूर्ण करून इतिहास रचला आहे.”
सायकल वारीचे अचूक नियोजन व मार्ग निश्चित करण्यात आला होता. वारी प्रमुख गिरीराज उमरीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सायकलवीरांनी खालील मार्गावरून शिस्तबद्ध रीतीने प्रवास पूर्ण केला. देहू – निगडी – नाशिक फाटा – हडपसर – उरुळी कांचन – भिगवण – इंदापूर – टेंभुर्णी – पंढरपूर या मार्गावर ठिकठिकाणी स्थानिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि फुलांचा वर्षाव करत सायकलस्वारांचे स्वागत केले. इंदापूर येथे नगरपालिकेचे लोकप्रिय नगराध्यक्ष भरतभाई शहा यांनी तर टेंभुर्णी येथे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय बाबा कोकाटे यांनी सायकल वारीचे भव्य स्वागत करत चोख आदरातिथ्य केले.
२३५० सायकलस्वारांना २३५ किलोमीटरच्या मार्गावर पाणी, प्रथमोपचार, तांत्रिक मदत आणि इतर सर्व सोयी पुरवणे हे अत्यंत कठीण आव्हान होते. मात्र, इंडो अथलेटिक्स सोसायटीच्या अहोरात्र झटणाऱ्या स्वयंसेवकांमुळे हा उपक्रम अत्यंत सुरक्षितपणे पार पडला.
गिरीराज उमरीकर, अविनाश चौगुले, अमित पवार, अनुप कोहले, अजित गोरे, अविनाश अनुसे, अभिजीत सरोदे, अजय चौरसिया, दीपक गुरुकुल, देविदास खुर्द, कपिल पाटील, मारुती विधाते, मंदार शेंडे, नितीन पवार, प्रदीप जी टाके, प्रमोद चिंचवडे, प्रणय कडू, प्रतीक पवार, प्रशांत तायडे, पवन आहेर, प्रशांत जाधव, रमेश माने, राहुल राणे, संतोष नखाते, सुनील चाकू, सुशील मोरे, श्रीकांत चौधरी, तुषार माने, विवेक कडू, योगेश तावरे, सुधाकर टिळेकर, शैलेश पाटील, अमृता पाटील, मनोज काशीद, नारायण मगडूत, मदन शिंदे आणि हेमंत दांगट पाटील या संपूर्ण तांत्रिक व व्यवस्थापकीय चमूने अथांग परिश्रम घेतले.
आरोग्याची जनजागृती, इंधन बचतीचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन आणि महाराष्ट्राच्या पवित्र वारकरी परंपरेचा हा सुंदर आणि अलौकिक मिलाफ साधणाऱ्या सायकल वारीचे आज संपूर्ण देशातून कौतुक केले जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
