‘मिर्झा एक्स्प्रेस’ थांबली! महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा यांचे अमरावतीत निधन
‘जांगडबुत्ता’ शब्दाचे जनक हरपले; वऱ्हाडी भाषेतील लोककवी आणि विदर्भ साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष
अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे, दि. २९ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट आणि ‘मिर्झा एक्सप्रेस’ फेम म्हणून ख्यातनाम असलेले डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज (शुक्रवार, दि. २८ नोव्हेंबर) सकाळी ६.३० वाजता दीर्घ आजाराने अमरावती येथे निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने वऱ्हाडी भाषेचा एक आधारस्तंभ ढासळला असून, संपूर्ण महाराष्ट्रातील चाहते आणि साहित्यसृष्टी हळहळ व्यक्त करत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज-माणिकवाडा हे त्यांचे मूळ गाव. सध्या ते अमरावती येथील वलगाव रोडवरील नवसारी परिसरात ‘मिर्झा एक्सप्रेस’ या त्यांच्या निवासस्थानी वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी फातेमा मिर्झा, अभियंता मुलगा रमीज आणि दोन सुविद्य कन्या महाजबी व हुमा असा परिवार आहे. त्यांच्यावर अमरावती येथील ईदगा कब्रस्तानात दुपारी दोननंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले डॉ. मिर्झा रफी अहमद बेग आपल्या खुमासदार सादरीकरणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. वयाच्या अवघ्या अकरा वर्षांपासून त्यांनी कविता लेखनाला सुरुवात केली, तर १९७० पासून मंचावर सादरीकरण करण्यास सुरुवात केली.
-
त्यांचे एकूण २० काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून, त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या ‘मिर्झा एक्सप्रेस’ या काव्य मैफिलीचे ६ हजारांवर सादरीकरण केले आहे.
-
त्यांचे ‘मिर्झाजी कहीन’ हा वृत्तपत्रातील स्तंभ तुफान लोकप्रिय ठरला होता.
-
शेती, माती, कृषी, शेतकऱ्यांच्या समस्या, ग्रामीण भागातील समस्या आणि राजकीय विरोधाभासावर नर्म विनोदी शैलीत लिखाण करणे ही त्यांची खास हातोटी होती.
-
‘मोठा माणूस’, ‘सातवा महिना’, ‘उठ आता गणपत’, ‘जांगडबुत्ता’ या त्यांच्या कविता प्रचंड लोकप्रिय ठरल्या. विशेष म्हणजे, ‘जांगडबुत्ता’ या शब्दाचे ते जनक आहेत.
डॉ. मिर्झा यांनी वऱ्हाडी भाषेवर निस्सीम प्रेम केले. त्यांच्या कार्यक्रमांनी वऱ्हाडी भाषेची महती देशाच्या राजधानी दिल्लीपासून ते महाराष्ट्राची राजधानी मुंबईपर्यंत पोहोचवली. ‘हिंदू मुसलमानात काय आहे फरक, हा म्हणते हटजा तो म्हणते सरक, काथा संग जसा चुना असते पानात, हिंदू संग मुसलमान तसा हिंदुस्थानात’ अशा रचनांमुळे ते सर्वधर्मीयांच्या गळ्यातील ताईत बनले होते.
ते विदर्भातील ख्यातनाम संत फकीरजी महाराज या मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी होते. त्यांचे वडील मिर्झा रज्जाक बेग उर्फ भाईजी हे यवतमाळ जिल्ह्यातील प्रभावी राजकीय-सामाजिक व्यक्तिमत्व होते. नागपूर येथील सुप्रसिद्ध ज्येष्ठ विधीज्ञ फिरदोस मिर्झा हे त्यांचे चुलत बंधू आहेत.
डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट आणि मिर्झा एक्स्प्रेस म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे, असे डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने एक उत्तम विनोदी लोककवी आणि सामाजिक जाण असलेले व्यक्तिमत्व आपण गमावले आहे. २० हून अधिक काव्यसंग्रह आणि ६००० वर काव्य मैफिलीचे प्रयोग त्यांनी केले. त्यांच्यामुळे वऱ्हाडी भाषेतील सादरीकरण राष्ट्रीय पातळीवर गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.”
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांच्या निधनाने महाराष्ट्रातील हास्यव्यंग कवी संमेलनातील एक महत्वाचा दुवा निखळला आहे. ‘जांगडबुत्ता’ हा शब्द कोणत्याही विनोदाला गोळीबंद स्वरूपात वापरण्यासाठी सगळ्याच व्यासपीठावर वापरला जात होता. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्यसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. वऱ्हाडी भाषेला देशव्यापी ओळख देणारा कवी हरपला आहे.”
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
