news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड कुष्ठमुक्त शहराच्या दिशेने! ७९ हजार घरांचे सर्वेक्षण, वेळेवर निदान आणि तात्काळ औषधोपचारांवर भर

पिंपरी-चिंचवड कुष्ठमुक्त शहराच्या दिशेने! ७९ हजार घरांचे सर्वेक्षण, वेळेवर निदान आणि तात्काळ औषधोपचारांवर भर

तपासणी, उपचार आणि समुपदेशन; अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी वैद्यकीय पथकाच्या शिस्तबद्ध कामगिरीचे केले कौतुक. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कुष्ठरोग शोध मोहीम’ यशस्वी: ३.६१ लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी, ११ रुग्णांचे निदान!

 

 

१७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान वैद्यकीय विभागातर्फे शहरभर गृहभेटी; लवकर निदान आणि उपचारांवर विशेष भर

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, बालाजी नवले, दि.डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे दि. १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात आलेली ‘कुष्ठरोग शोध मोहीम’ यशस्वीरीत्या संपन्न झाली आहे. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या अधिपत्याखाली पार पडलेल्या या मोहिमेमुळे शहरातील नागरिकांमध्ये कुष्ठरोगाविषयी जनजागृती वाढली असून, वेळेवर रुग्णांचे निदान करण्यास मदत झाली आहे.

या मोहिमेदरम्यान एकूण ७९,१७७ घरांना प्रत्यक्ष भेटी देऊन सुमारे ३ लाख ६१ हजार ८५४ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. सर्वेक्षणादरम्यान ११ रुग्णांना कुष्ठरोग असल्याचे निदान झाले असून, त्यांना तत्काळ प्राथमिक औषधोपचार देऊन पुढील मार्गदर्शन करण्यात आले आहे.

मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वैद्यकीय विभागाने एकूण २१२ जणांचे पथक तैनात केले होते. यात तज्ज्ञ डॉक्टर, सुपरवायजर, प्रशिक्षित आशा स्वयंसेविका आणि पुरुष स्वयंसेवकांचा समावेश होता. सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने शहराच्या विविध वसाहती, झोपडपट्ट्या, घनदाट लोकवस्ती, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ क्षेत्रे तसेच संवेदनशील भागांमध्ये गृहभेटीद्वारे नागरिकांची तपासणी केली. पथकाने त्वचेवरील डाग, संवेदना कमी होणे, मुंग्या येणे, सूज किंवा कुष्ठरोगाची कोणतीही संभाव्य लक्षणे असलेल्या नागरिकांचे बारकाईने परीक्षण केले.

अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी या कामगिरीबद्दल पथकाचे कौतुक केले. ते म्हणाले, “कुष्ठरोग नियंत्रणासाठी लवकर निदान आणि तात्काळ उपचार हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. महानगरपालिकेच्या वैद्यकीय पथकांनी ज्या शिस्तबद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवल्या, ते प्रशंसनीय आहे.”

आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले की, “कुष्ठरोगाची लक्षणे अनेकदा लहान वाटतात, पण त्याकडे दुर्लक्ष केल्यास आजार वाढू शकतो. तपासणी, उपचार आणि समुपदेशन या तीन गोष्टींनी आपण शहराला कुष्ठमुक्त करण्याच्या दिशेने ठोस पाऊल टाकत आहोत.”

महानगरपालिकेच्या या व्यापक मोहिमेमुळे लक्षणे असलेल्या अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने तपासणी केली. वैद्यकीय विभागातर्फे मोहिमेदरम्यान समुपदेशन, उपचार, मार्गदर्शन आणि फॉलो-अप यावरही विशेष भर देण्यात आला.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!