‘एड्सला लढा देऊ, नवपरिवर्तन घडवू’! अमरावतीत एचआयव्ही जनजागृती रॅलीत अडीच हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
जिल्हा सामान्य रुग्णालयातून रॅलीला हिरवी झेंडी; जिल्ह्याने एचआयव्ही संक्रमणाचा टक्का कमी केल्याबद्दल डॉ. विनोद कंदेवाड यांचे कौतुक
अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे, दि.५डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
जागतिक एड्स दिनानिमित्त (१ डिसेंबर) अमरावती शहरात आज (दि. ४ डिसेंबर २०२५) ‘भव्य एड्स जनजागृती रॅली’ चे आयोजन करण्यात आले होते. ‘अडथळ्यावर मात करू, एकजुटीने एड्सला लढा देऊ, नवपरिवर्तन घडवू’ या घोषवाक्यासह आयोजित या रॅलीत शहरातील अडीच हजाराहून अधिक विद्यार्थी आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
जिल्हा सामान्य रुग्णालयातून या रॅलीला महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा संचानालयाचे संचालक डॉ. विनोद कंदेवाड यांनी हिरवी झेंडी दाखवली.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. विनोद कंदेवाड यांनी अमरावती जिल्ह्याने एचआयव्ही संक्रमणाचा टक्का कमी केल्याबद्दल कौतुक केले. ते म्हणाले की, “सर्वसमावेशक जनजागृतीने एचआयव्हीच्या जनजागृती कार्यक्रमास मदत होईल आणि आपण निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करू शकतो.”
रॅलीमध्ये वैद्यकीय, नर्सिंग, समाजकार्य, कृषी आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. अति जोखमीच्या गटांसाठी कार्यरत असलेल्या सामाजिक संस्थांचे माहिती रथ यात समाविष्ट होते, ज्यातून समुपदेशन आणि सुविधांची माहिती देण्यात आली.
जिल्हा सामान्य रुग्णालयातून निघालेली ही रॅली रेल्वे कॉटन मार्केट, राजकमल, श्याम चौक मार्गे पुन्हा इर्विन चौकातून जिल्हा सामान्य रुग्णालयात समारोपित झाली.
या यशस्वी आयोजनात अकोला परिमंडळ आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. सुशीलकुमार वाकचौरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नंदकिशोर राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

