वाहनांना ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ (HSRP) लावण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर!
राष्ट्रीय सुरक्षा आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी HSRP आवश्यक; अमरावती प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांचे आवाहन
अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे, दि. ५ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
केंद्रीय मोटार वाहन नियमांनुसार, महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसवणे अनिवार्य केले आहे. वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये होणारी छेडछाड व बनावटगिरी कमी करणे, रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय आवश्यक असून, सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत निर्देश दिले आहेत.
अमरावती प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील सर्व वाहनधारक, तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालये आणि बँका यांनी त्यांच्या १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घेणे अनिवार्य आहे.
-
अंतिम मुदत: एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ ही आहे.
-
कारवाई: ३१ डिसेंबर २०२५ नंतर एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर, तसेच बनावट एचएसआरपी असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
-
परिवहन कार्यालयातील कामकाज: या वाहनांबाबतचे परिवहन कार्यालयातील (RTO) कामकाज थांबविण्यात येईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिला आहे.
सर्व वाहनधारकांनी लवकरात लवकर त्यांच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवून घेऊन दंडात्मक कारवाई टाळावी.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
