नवी सांगवीचे खचलेले रस्ते ‘धोक्याची घंटा’; युवासेना जिल्हा उपाध्यक्ष मेघराज लोखंडे यांनी घेतली रस्त्यांसाठी धाव
संत तुकाराम नगर गल्ली क्र. २ व ३ मधील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची महापालिकेकडे मागणी; अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ९ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड शहराला लागून असलेल्या नवी सांगवी परिसरातील संत तुकाराम नगर, गल्ली क्रमांक २ व ३ मधील डांबरी रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, खचलेले रस्ते नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे, खचलेले डांबर आणि उंच-सखल रस्ता यामुळे नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवर मोठा परिणाम झाला आहे. वाढत्या वाहतुकीमुळे आणि खराब रस्त्यांमुळे अपघातांमध्येही वाढ झाली असून, परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नागरिकांच्या या गंभीर समस्येची दखल घेऊन युवासेना शिवसेना मावळ लोकसभा जिल्हा उपाध्यक्ष मेघराज लोखंडे यांनी आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (२) यांना सविस्तर निवेदन दिले. रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी या निवेदनात केली आहे.
निवेदनात मेघराज लोखंडे यांनी सांगितले की, सांगवी येथील खचलेले व बसलेले डांबरी रस्ते त्वरित समतल करून संपूर्ण डांबरीकरण करण्याची आवश्यकता आहे.
-
धोकादायक स्थिती: अपघातांची वाढती शक्यता, विद्यार्थ्यांचे व वृद्ध नागरिकांचे होणारे हाल आणि गर्दीच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी यावर त्यांनी विशेष लक्ष वेधले.
-
मेघराज लोखंडे म्हणाले, “नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणे होय. सांगवीतील रस्त्यांची जी अवस्था झाली आहे, ती अत्यंत धोकादायक आहे. महानगरपालिकेने तातडीने पाऊले उचलून रस्त्यांचे डांबरीकरण करावे, हीच आमची अपेक्षा आहे.”
नवी सांगवीतील नागरिकांना सुरक्षित व सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महानगरपालिकेने त्वरित ठोस पाऊले उचलावीत, अशी एकमुखाने मागणी नागरिक आणि युवासेनेकडून करण्यात येत आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
