अखेर पदोन्नतीला मंजुरी! मुख्य अभियंता, सहशहर अभियंता, वैद्यकीय अधीक्षक, माहिती तंत्रज्ञान अधिकारी यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना प्रशासक श्रावण हर्डीकर यांचा हिरवा कंदील
माता रमाई सृष्टीसाठी पुतळा उभारणे, DNB शिक्षकांचे मानधन आणि आशा स्वयंसेविकेच्या प्रोत्साहन भत्त्याच्या विषयांनाही महापालिका सभेत मान्यता
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि.१२ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागांतील अधिकाऱ्यांच्या प्रलंबित पदोन्नतींना आणि महत्त्वपूर्ण विकास कामांना प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी (दि. ११ डिसेंबर २०२५) झालेल्या महापालिका सभेत (स्थायी समितीसह) ऑनलाइन उपस्थित राहून मान्यता दिली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात ही बैठक पार पडली.
बैठकीला अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी खालील महत्त्वपूर्ण पदांवरील पदोन्नतींना मान्यता दिली:
| पदोन्नतीचे पद | अधिकाऱ्याचे नाव |
| मुख्य अभियंता – २ | प्रमोद ओंभासे |
| सह शहर अभियंता | प्रेरणा सिनकर |
| माहिती व तंत्रज्ञान अधिकारी | अनिल कोल्हे |
| ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी | डॉ. अर्चना गांधी, डॉ. पद्मजा हवालदार, डॉ. रोहित पाटील |
| वैद्यकीय अधीक्षक | डॉ. उज्ज्वला अंदुरकर |
| स्त्रीरोग प्रसुती तज्ञ | विशाल कराळे |
| कार्यकारी अभियंता | योगेश अल्हाट, सूर्यकांत मोहिते, सुधीर मोरे, उमेश मोने, रविंद्र सूर्यवंशी |
महापालिका सभेत अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली:
-
माता रमाई सृष्टी: सन २०२५-२६ च्या अंदाजपत्रकात समाविष्ट असलेल्या ‘पिंपरी चौक येथे माता रमाई पुतळा उभारणे व इतर स्थापत्य विषयक कामे करणे’ या कामाच्या नावात बदल करून, आता ‘पिंपरी चौक येथे माता रमाई सृष्टीसाठी ब्राँज म्युरल्स व पुतळा उभारण्याचे काम करणे’ या कामाच्या नावाचा अंदाजपत्रकात समावेश करण्यास मंजुरी.
-
डुडूळगाव डीपी रस्ता: मौजे डुडूळगाव, गट क्र. १९० पै (चऱ्होली फाटा ते डुडूळगाव) मधील प्रारूप विकास योजनेतील ३० मीटर डीपी रस्ता विकसित करण्यासाठी ९११४.७४ चौ. मी. क्षेत्र वन विभागाकडून हस्तांतरित करणे.
-
पर्यावरण अभ्यास: पिंपरी-चिंचवड शहराकरीता सोर्स अपॉईंटमेंट, इमिशन इन्व्हेंटरी, कॅरींग कॅपेसीटी स्टडी करणे.
-
DNB कोर्सेस: डीएनबी कोर्सेस सुरू असणाऱ्या रुग्णालयांतील डीएनबी शिक्षकांच्या मानधनास मान्यता देणे.
-
निवडणूक सुविधा: महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने प्रारूप/अंतिम मतदार यादी आणि मतदान केंद्रांची माहिती नागरिकांना ऑनलाइन वेब पोर्टलद्वारे सर्च करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे.
-
उत्सवांसाठी व्यवस्था: प्रभाग क्र. ३१ नवी सांगवी येथील फेमस चौक, एम के हॉटेल चौक, मयुरीनगरी चौक व इतर ठिकाणी गणेशोत्सव व इतर वेळेस कार्यक्रमासाठी मंडप व्यवस्था, यंत्रसामुग्री पुरविणे.
-
कर्मचाऱ्यांसाठी लाभ: सन २०२४-२५ मध्ये काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका यांना दिवाळीनिमित्त प्रोत्साहनपर भत्ता अदा करणे.
-
जागरूकता मोहिम: पिंपरी-चिंचवड परिसरात हवा प्रदूषण कमी करण्यासाठी जनजागृतीसाठी रेडिओ मोहीम राबविणे आणि इंद्रायणी स्वच्छता अभियान जनजागृती मोहीम अंतर्गत रिव्हर सायक्लॉथॉन उपक्रमाचे आयोजन करणे.
-
रुग्णालयांसाठी खरेदी: यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या कान, नाक व घसा विभागाच्या ऑपरेशन थिएटरसाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी प्लाझ्मा सर्जिकल सिस्टीम विथ वॅन्ड्स उपकरण खरेदी करणे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

