पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिक्रमण विभागाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात ‘चिल्लर फेक’ आंदोलन
प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर पँथर दत्ताभाऊ गायकवाड यांनी आंदोलन घेतले मागे; मुकाई चौकातील अनधिकृत कंटेनरवर होणार कारवाई
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि.१७ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या मनमानी आणि जनविरोधी कारभाराच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) व्यापारी आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पँथर दत्ताभाऊ गायकवाड यांच्या वतीने सोमवारी (दि. १५ डिसेंबर २०२५) तीव्र स्वरूपाचे ‘चिल्लर फेक’ आंदोलन करण्यात आले. महापालिका प्रशासनाने मागण्या मान्य करून लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
दत्ताभाऊ गायकवाड यांनी अतिक्रमण विभागावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते:
-
अतिक्रमण कारवाई करताना नियम आणि मानवी संवेदना पायदळी तुडवून सामान्य नागरिक, फेरीवाले आणि छोट्या व्यावसायिकांवर अन्याय केला जात आहे.
-
वरिष्ठ प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून केवळ आर्थिक देवाण-घेवाण आणि वैयक्तिक हितसंबंध साधण्यासाठी ठराविक ठिकाणीच कारवाई केली जाते.
-
धनदांडग्यांच्या अनधिकृत बांधकामांकडे आणि पत्रा शेडकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आंदोलकांनी प्रामुख्याने ‘ब’ प्रभाग अधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी करण्याची आणि चुकीच्या पद्धतीने जप्त केलेल्या गाड्या त्वरित सोडण्याची मागणी केली. तसेच, मुकाई चौक, किवळे येथील रामदयाल गुप्ता यांच्या अनधिकृत कंटेनर व्यवसायावर कारवाई करण्याची आग्रही मागणी लावून धरली.
प्रशासनाने दिलेले लेखी आश्वासन:
१) चुकीची कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर चौकशी करून गुन्हे दाखल केले जातील.
२) मुकाई चौकातील रामदयाल गुप्ता यांचे अनधिकृत कंटेनर व पत्राशेडवर त्वरित कारवाई केली जाईल.
प्रशासनाकडून हे सर्व मुद्दे लेखी स्वरूपात मिळाल्यानंतर दत्ताभाऊ गायकवाड यांनी आपले आंदोलन स्थगित केले.
“अतिक्रमण विभागाकडून सामान्य कष्टकऱ्यांना त्रास दिला जातो, पण जिथून हप्ते चालू आहेत तिथे डोळेझाक केली जाते. हा भ्रष्ट कारभार आम्ही उघडा पाडणारच. मुकाई चौकातील अनधिकृत कंटेनरवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने आम्ही सध्या आंदोलन मागे घेतले आहे.”
— दत्ताभाऊ गायकवाड (उपाध्यक्ष, आरपीआय – आठवले गट, व्यापारी आघाडी)
यावेळी अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनामुळे महापालिका परिसरात काही काळ तणावाचे आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले होते.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
