कोल्हापूरच्या लेकीचा देदिप्यमान इतिहास! लेफ्टनंट सई जाधव ठरली आयएमएमधून प्रशिक्षण पूर्ण करणारी देशातील पहिली महिला ‘टीए’ अधिकारी
जाधव कुटुंबातील चौथी पिढी देशसेवेसाठी सज्ज; खडतर मेहनतीनंतर कोल्हापूरची कन्या भारतीय लष्करात दाखल
कोल्हापूर, दि.१८ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरची कन्या सई जाधव (Sai Jadhav) हिने भारतीय लष्कराच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. देहरादून येथील प्रतिष्ठित इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) मधून आपले ‘प्रि-कमिशनिंग’ प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणारी ती पहिली टेरिटोरियल आर्मी (TA) महिला अधिकारी ठरली आहे. १३ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये २३ वर्षीय लेफ्टनंट सई जाधव हिने हे यश संपादन केले.
साईचे वडील मेजर संदीप जाधव (Major Sandeep Jadhav) हे सध्या ईशान्य भारतात टेरिटोरियल आर्मीच्या बटालियनमध्ये कार्यरत आहेत. सईच्या आई ज्योती जाधव (Jyoti Jadhav) यांनी सांगितले की, सईला बालपणापासूनच लष्करी गणवेशाचे प्रचंड आकर्षण होते. सई पाचवीत असताना तिचे वडील मेजर संदीप जाधव यांची बदली अंदमान आणि निकोबार बेटांवर झाली होती. वडिलांसोबत राहून तिथेच शिक्षण घेण्याचा हट्ट सईने धरला आणि तिने आपले शालेय शिक्षण ग्रेट निकोबार बेटावर पूर्ण केले.
जाधव कुटुंबासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे, कारण सई ही तिच्या कुटुंबातील चौथी पिढी आहे जी देशसेवेसाठी लष्करात दाखल झाली आहे.
-
साईचे पणजोबा ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये कार्यरत होते.
-
तिच्या वडिलांचे मामा भारतीय हवाई दलात (IAF) होते.
-
तिचे वडील मेजर संदीप जाधव सध्या टीएमध्ये सेवा बजावत आहेत.
-
आता लेफ्टनंट साई जाधव स्वतः टेरिटोरियल आर्मीच्या उत्तर क्षेत्रात (Northern Sector) आपल्या कर्तव्याची सुरुवात करणार आहे.
सईने या यशासाठी मोठी मेहनत घेतली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या टेरिटोरियल आर्मीच्या प्रवेश परीक्षेत तिने उत्कृष्ट गुण मिळवले. त्यानंतर झालेल्या एसएसबी (SSB) मुलाखतीत तिने देशात प्रथम क्रमांक पटकावला. महिला अधिकाऱ्यांसाठी टीए मध्ये केवळ एकच जागा रिक्त होती आणि सईने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर ती जागा मिळवली. ४ जुलै २०२५ रोजी ती प्रशिक्षणासाठी ‘आयएमए’मध्ये दाखल झाली होती.
यापूर्वी काही महिला अधिकाऱ्यांनी आयएमए मध्ये ‘पोस्ट कमिशनिंग’ प्रशिक्षण घेतले आहे, परंतु कमिशन मिळण्यापूर्वीचे ‘प्रि-कमिशनिंग’ प्रशिक्षण पूर्ण करणारी सई ही पहिलीच महिला टीए अधिकारी ठरली आहे. कोल्हापूरच्या या कन्येने मिळवलेल्या यशामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
