news
आयटीआय धारकांसाठी डिफेन्स पीएसयू ‘BEML’ मध्ये नोकरीची मोठी संधी; ३६२ ऑपरेटर पदांसाठी भरती सुरू!लखनौमधील भीषण आगीने हिरावले दोन उमलते जीव; नोव्हेंबरमध्ये विवाहबंधनात अडकणाऱ्या ॲनिमेशन कलाकारांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू!पालखी सोहळा सुरक्षित व भक्तीमय वातावरणात पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस सज्ज; देहू-आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांसोबत आयुक्तांची महत्त्वपूर्ण बैठक!अपघाताचा बनाव फसला! लोहगड दरीतील मृत्यू हा तर थंड डोक्याने केलेला मर्डर; वाग्दत्त वधूसह प्रियकराला लोणावळा पोलिसांकडून अटकखरातवाडीच्या शेतकऱ्यांच्या पाणी हक्कासाठी मारुती भापकरांचा श्रीगोंद्यात एल्गार; ७ तासांच्या आमरण उपोषणापुढे प्रशासन झुकले!
Home पिंपरी चिंचवड “निवडणुकीतील टीका अजूनही कानात घुमतेय!”; अजितदादांच्या स्मारकावरून राष्ट्रवादी आक्रमक; भाजपच्या प्रस्तावाला विरोध

“निवडणुकीतील टीका अजूनही कानात घुमतेय!”; अजितदादांच्या स्मारकावरून राष्ट्रवादी आक्रमक; भाजपच्या प्रस्तावाला विरोध

"स्मारकाचे राजकारण नको, आधी दादांची स्वप्ने पूर्ण करा!"; राष्ट्रवादीच्या माधव पाटील यांचे आमदार महेश लांडगे यांना खरमरीत पत्र. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘अजित सृष्टी’वरून पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय ठिणगी; आमचा देव तुमच्या देव्हाऱ्यात ठेवू नका, माधव पाटलांचा आमदार लांडगेंना सणसणीत टोला


पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, ४ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड : शहरातील भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार महेश लांडगे यांनी दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘अजित सृष्टी’ उभारण्याचे जाहीर केल्यानंतर शहरात नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते माधव पाटील यांनी समाज माध्यमांद्वारे पत्र लिहीत, आमदार लांडगे यांनी ‘अजित सृष्टी’साठी चालवलेले प्रयत्न तातडीने थांबवावेत, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

माधव पाटील यांनी पत्रात थेट शब्दांत सुनावले आहे की, “आमचा देव तुम्ही तुमच्या वैयक्तिक कल्पनेच्या देव्हाऱ्यात ठेवू नका. महानगरपालिकेच्या पैशातून काय करायचे, हे शहरातील १२८ लोकप्रतिनिधी ठरवतील. ते सर्व मिळून ‘सर्वांना आपलंस वाटेल’ असं अद्वितीय स्मृतिस्थळ नक्कीच घडवतील.” आधीच राम, गांधी आणि वल्लभभाई पटेल यांना राजकीय पक्षांनी वाटून घेतले आहे, तसे दादांच्या बाबतीत करू नका, अशी विनंतीही त्यांनी केली.

मोशीमधील छत्रपती संभाजी महाराजांचे ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ हे शिल्प जणू काही तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे, असे आज पिंपरी-चिंचवडकरांना वाटते. तसाच प्रकार दादांच्या स्मारकाच्या बाबतीत होऊ नये, असा टोला पाटील यांनी आमदार लांडगे यांना लगावला आहे.

“निवडणुकीच्या काळात तुम्ही दादांवर केलेली टीका अजूनही आमच्या कानात घुमत आहे. ती दादांना वेदना देणारी होती. विजयानंतर तुम्ही माफी मागून वैर संपवायला हवे होते,” अशा शब्दांत पाटील यांनी जुन्या जखमांना उजाळा दिला. अजितदादा त्यांच्या मिश्किल शैलीत ‘झालं गेलं गंगेला मिळालं’ म्हणून विषय संपवून टाकतील, मात्र स्मारकाचे राजकारण करू नका, असेही पत्रात म्हटले आहे.

माधव पाटील यांनी आमदारांना सुनावले की, तुम्हाला खरोखरच दादांसाठी काही करायचे असेल, तर त्यांनी पाहिलेली ही तीन स्वप्ने पूर्ण करा:

१) शहराला रोज पाणी पुरवठा करणे.

२) ४९ हजार हरकतींचा आणि हजारो घरांवर फिरणारा ‘डीपी’चा बुलडोझर कायमचा थांबवणे.

३) मेट्रो आणि पीएमपीएमएल सेवा मोफत करून शहर प्रदूषणमुक्त करणे.

“ही कामे पूर्ण करणे म्हणजेच आमच्यासाठी खरी ‘अजित सृष्टी’ असेल,” असे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.

माधव पाटील यांच्या या पत्रामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता आमदार महेश लांडगे यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!